मेडिकल सुरू करण्यासाठी आता पात्रता परीक्षा महत्वाची

संतोष विंचू
शनिवार, 18 मे 2019

डी फार्मसी म्हणजे औषधनिर्माण शास्त्र पदविका घेतली की, कोणीही कुठेही मेडिकल सुरू करण्यास मोकळे अशी आतापर्यंतची नियमावली मात्र यात लवकरच बदल होणार असून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने आता यामध्ये एक स्पीडब्रेकर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना मेडिकल स्टोअरच्या नोंदणी प्रक्रियेसाठी एक्झिट (EXIT) परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्यावर अंमलबजावणी होणार आहे.

येवला : डी फार्मसी म्हणजे औषधनिर्माण शास्त्र पदविका घेतली की, कोणीही कुठेही मेडिकल सुरू करण्यास मोकळे अशी आतापर्यंतची नियमावली मात्र यात लवकरच बदल होणार असून फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने आता यामध्ये एक स्पीडब्रेकर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना मेडिकल स्टोअरच्या नोंदणी प्रक्रियेसाठी एक्झिट (EXIT) परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला असून लवकरच त्यावर अंमलबजावणी होणार आहे.

दवाखाना म्हटलं की, मेडिकल आलेच किंबहुना वाढलेले आजार व औषधांची मागणीमुळे गल्लोगल्ली मेडिकल स्टोअर्स सुरू होत आहे. आता यात गुणवत्ता आणि अचूकता यावी या हेतूने शासनाने आता एक्झिट परीक्षेचा निर्णय घेतला आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने तसे परिपत्रकही काढले असून केंद्र शासनाचा यासंदर्भात लवकरच परिपत्रकाद्वारे निर्णय जाहीर होण्याची शक्यता असल्याचे येथील मातोश्री फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य पवन आव्हाड यांनी सांगितले. 

डि. फार्मसी हि करियरची एक उत्तम संधी असल्याने दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. याची प्रवेश प्रक्रिया सरळ व सोपी असून, तंत्रशिक्षण संचलनलाय ही प्रक्रिया राबवते. डि.फार्मसी पास झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणीचे काम महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद करते. पण आता विद्यार्थ्यांना नोंदणी प्रक्रियेसाठी एक्झिट परीक्षा द्यावी लागणार आहे. या परिक्षेचा मुख्य उद्देश हा रिटेल व होलसेल औषधे विक्रेता हा प्रशिक्षित, उत्तम ज्ञान असलेला, शिस्तबद्ध, कौशल्य, अचूकता, तर्कवान व मूल्यांचे पालन करणारा असावा असे परिषदेचे म्हणणे आहे. त्यासाठी बहुपर्यायी प्रश्नांच्या परीक्षेतून सदर गुण दिसून येतील. 

असे असेल स्वरूप..
एक्झिटचे स्वरूप फार्मसी कौन्सिलने जाहीर केले आहे.त्यानुसार परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाने ऑनलाईन पद्धतीने घेतली जाईल. परीक्षा घेण्याचा अधिकार फार्मसी परिषदेने ठरून दिलेले परीक्षामंडळ किंवा महारष्ट्र राज्य फार्मसी परिषद यांच्या संकेतस्थळावर नोंदणी करून अर्ज भरावा लागेल. अभ्यासक्रम व परीक्षेची पध्दत वेळोवेळी फार्मसी कौन्सिल विद्यार्थ्यांना कळवणार आहे. वर्षातून दोन वेळा,विविध केंद्रावर व इंग्रजी भाषेतून परीक्षा होईल.यासाठी प्रत्येकी १०० गुणांचे तीन पेपर असतील व प्रत्येक पेपरसाठी तीन तासांचा वेळ मिळेल. प्रत्येक पेपर मध्ये किमान ५० गुण उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असतील. एखादा विद्यार्थी तीन पैकी कुठल्याही एक पेपरमध्ये अनुत्तीर्ण झाला किंवा त्याला ५० पेक्षा कमी गुण मिळाले त्याला पुढील वेळेस तीनही पेपर पुन्हा देणे बंधनकारक असेल.

“रुग्णांना योग्य औषधे, योग्य प्रमाणात व योग्य वेळेत मिळवीत तसेच मूल्यांचे पालन व्हावे यासाठी हि परीक्षा घेण्याचा निर्णय झाला आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नोंदणीसाठी प्रमाणपत्र देण्यात येईल व त्यावरून त्यांची महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद यांच्याकडे नोंदणीकृत फार्मासिस्ट म्हणून नोंदणी केली जाईल. हि परीक्षा गुंतागुंतीची वाटत असली तरी वाढती स्पर्धा व गैरप्रकारांमुळे फार्मसी कौन्सिलने हा निर्णय घेतला असावा.”
- पवन आव्हाड, प्राचार्य,मातोश्री इंस्टिट्यूट ऑफ फार्मसी,धानोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now the eligibility exam is important for starting medical