नाशिकची वीजनिर्मिती नावालाच?

नीलेश छाजेड
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

एकलहरे - एकलहरे (नाशिक) येथील वीजनिर्मिती संच पुढील दोन वर्षांत टप्प्याटप्प्याने बंद करणार आहे. त्याऐवजी नागपूरमधील उमरेड तालुक्‍यात 660 मेगावॉटचा प्रकल्प प्रस्तावित आहे. कंपनीने नियामक आयोगाला तसे पत्र दिले आहे. वीजनिर्मिती कंपनीचे हे धोरण पाहता पुढील दोन वर्षांत एकलहरे व भुसावळ येथील वीजनिर्मितीची ओळखच कायमची पुसली जाणार आहे. नवीन रोजगारनिर्मिती तर दूरच; पण प्रकल्पांच्या पळवापळवीमुळे उत्तर महाराष्ट्रात बेरोजगारी मात्र वाढणार आहे.

एकलहरे औष्णिक वीज केंद्रातील 210 मेगावॉटचे तिन्ही संच 2019- जानेवारी 2021 पर्यंत टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहेत. त्यामुळे नाशिकची वीजनिमिर्तीची ओळख नावालाच राहील. यापूर्वीच एकलहरे केंद्रातील 125 मेगावॉटचे दोन संच बंद केले आहेत. त्याबदल्यात येथे 660 मेगावॉटच्या नवीन संचास मंजुरी दिली गेली; पण गेल्या चार वर्षांपासून हा प्रकल्प परवानगीविना अडकून आहे. 2021 पर्यंत कंपनीला विजेची गरज नसल्याने भविष्यात मुंबईसाठी हा प्रकल्प सुरू केला जाऊ शकतो. तोपर्यंत मंजूर प्रकल्प बंद आहे.

विदर्भात उमरेडला प्रकल्प
आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये (केस 154-2018) एकलहरेचा 210 मेगावॉटचा एक संच, भुसावळ संच दोन व तीनच्या बदल्यात भुसावळ 660 मेगावॉट, एकलहरे संच 4 (जुलै 2020 मध्ये बंद होणार), तर संच 5 (जानेवारी 2021मध्ये बंद होणार), कोराडीचा 200 मेगावॉटचा संच क्र. 5 व इतर 2016 पर्यंत बंद करण्यात येणाऱ्या संचाच्या बदल्यात उमरेड येथे 800 मेगावॉटचे दोन संच प्रस्तावित आहे. नियामक आयोगाच्या दोन्ही आदेशात नाशिकचा एकलहरे प्रकल्प बंद होणार आहेच; पण सोबतच भुसावळ येथील दोन संच बंदचे नियोजन आहे. नाशिकचे जुने संच बंद करून नवीन 660 मेगावॉट प्रकल्पांचे आश्‍वासन गुंडाळले गेले आहे. त्याचप्रमाणे भुसावळबाबतही तसे झाल्यास उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण वीजनिर्मिती बंद होणार आहे.

वीजनिर्मितीचे संकट
-नाशिक, भुसावळचे वीजनिर्मिती संच टप्प्याटप्प्याने बंद
-उत्तर महाराष्ट्राचे संच बंद करून उमरखेडला प्रस्तावित
-नवे रोजगार नाही, आहे ते रोजगार संपण्याने उपासमारी

मला याविषयी लगेच काही सांगता येणार नाही. माहिती घ्यावी लागेल.
-चंद्रकांत थोटवे, संचालक,
संचालन- महानिर्मिती

फोटो-18926
नाशिक ः एकलहरे येथील औष्णिक वीजनिर्मिती केंद्र. (संग्रहीत छायाचित्र)

Web Title: Nuclear Electricity Generation Issue