पाणीटंचाईने शालेय पोषण आहार बंद !

योगेश महाजन
मंगळवार, 25 जून 2019

जळगावातील अळमनेर येथील शाळांनी मुलांचा पोषण आहारच बंद केला आहे. शाळा प्रशासनाकडून पालिका अथवा तहसील प्रशासनाला मागणी केली आहे. ती मागणी पुर्ण झाल्याशिवाय आम्ही नियमित पोषण आहार देऊ शकत नाही, असे संबंधित शाळांनी कळविले आहे.

अमळनेर : तीव्र पाणीटंचाईने साने गुरुजी शाळेत आज शालेय पोषण आहारातील खिचडी शिजलीच नाही. पाणीच नसल्याने आता हा आहार बंद करण्यात आल्याचा निर्णय घेत आहोत. पालिका अथवा तहसील प्रशासनाने रोज आहारासाठी लागणारे पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे; तरच आम्ही नियमित पोषण आहार देऊ शकतो, अशी माहिती संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

श्री. घोरपडे म्हणाले, की शाळेत सुमारे 2300 विद्यार्थी आहेत. त्यांच्या पोषण आहारासाठी रोज एक हजार लिटर पाणी लागते. अडचणींवर मात करुन हा पुरवठा सुरळीत ठेवला होता. शाळा परिसरातील विहीर, कुपनलीकाही आटल्याने टँकरने पाणी आणत होतो. मात्र, आज आम्हास पाणीटंचाईने पाण्याचे टँकर उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामूळे विद्यार्थ्यांना आहार देऊ शकलो नाही. तरीही आम्ही पूरक आहार म्हणून बिस्कीट विद्यार्थ्यांना दिले आहेत. आम्ही आता नगराध्यक्ष, तहसीलदार यांना भेटून पाणी मिळण्याबाबत मागणी करणार आहोत. शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी यांच्याकडून मार्गदर्शन मागवणार आहोत, असेही श्री. घोरपडे यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापक एस. डी. देशमुख, अनिता बोरसे, मेघा देवरे, गुणवंतराव पाटील, श्रीप्रकाश निकम आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nutrition food which is given by schools is stop because water scarcity at alamner