तेलबियावर्गीय पिकांच्या लागवडीत घट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2017

गणपूर (ता. चोपडा) - कधी काळी हजारो एकर तिळी, भुईमूग आदी तेलवर्गीय पिकांची लागवड सद्यस्थितीत कमालीची घट झाली आहे. मोहरी सारख्या पिकांची लागवड दिसू लागली आहे. बदलत्या हवामानात होणाऱ्या मोहरी लागवडीला कृषी विभागाकडून मार्गदर्शन, प्रोत्साहनासह आर्थिक सहकार्य झाल्यास खानदेशात या पिकांचे पेरणी क्षेत्र वाढण्यास मदत होणार आहे.

जिल्ह्यात १९८५ पर्यंत हजारो एकर क्षेत्रावर खरीपात तीळीचा पेरा होत असे. बिघ्याला तीन पोते असे उत्पादन घेणारे अनेक शेतकरी त्यानंतर अन्य पिकांकडे वळले. बागायतीचे वाढलेले प्रमाण, लहरी हवामान आणि मजुरटंचाई अशा एक ना अनेक कारणांनी तीळीचा पेरा घटत आला असून तो आता काही शेकड्यावरील एकरवरही दिसत नाही. नंदुरबार, धुळे जिल्ह्याच्या काही भागात खरीप भुईमुंग लागवड होत होती. मात्र, कमी पावसाळ्यामुळे ती अत्यल्प झाली आहे. वाढता उत्पादन खर्च हे ही एक कारण त्यामागे आहे.

उन्हाळी भुईमूगाची लागवड शेती बागायती झाल्यावर वाढली खरी. मात्र, ती जास्त काळ टिकली नाही. १९८० च्या दरम्यान करवंद (शिरपूर) च्या पाण्यावर अर्थे, वाघाडी, करवंद, विखरण, भामटे आदी शिवारात तर अनेरच्या पाण्यावर गणपूर, लासूर, मराठे आदी शिवारात त्या काळी लाखोच्या आकड्यात भुईमूग शेंगा पिकत होत्या. मात्र, नंतर हा पेराच दहा टक्‍क्‍यावर आला. त्याकाळी रब्बीत दिसणारा करडईचा पेरा आता दिसेनासा झाला आहे.

मात्र, गेल्या काही वर्षात शेतकरी मोहरी पिकाकडे वळले असून हे पीक बऱ्याच भागात दिसू लागले आहे. या पिकासाठी तेलवर्गीय पीक म्हणून कृषी विभागाने शासकीय पातळीवरून पाठपुरावा करुन प्रोत्साहन दिल्यास तेलवर्गीय पीक म्हणून लागवड क्षेत्रात वाढ होऊ शकेल.

लागवडीमध्ये मातीतील वाढलेला पीएच कमी होण्यास मदत झाली आहे. पिकाला प्रोत्साहनपर आर्थिक मदत शासकीय स्तरावरून दिल्यास पेरणी क्षेत्रात वाढ होऊ शकेल आणि तेलवर्गीय पिकांचे क्षेत्रही वाढेल.
- उदय पाटील, चहार्डी, ता. चोपडा

Web Title: oil seed decline in the cultivation of crops