जुन्या, मळक्‍या 27 कोटींच्या नोटा पदरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

नाशिक - नाशिक जिल्ह्याने मागितलेल्या अडीचशे कोटी रुपयांपैकी अवघे 27 कोटी रुपये आज प्राप्त झाले. तेही जुन्या जीर्ण नोटांच्या स्वरूपात मिळाले आहेत.

नाशिक - नाशिक जिल्ह्याने मागितलेल्या अडीचशे कोटी रुपयांपैकी अवघे 27 कोटी रुपये आज प्राप्त झाले. तेही जुन्या जीर्ण नोटांच्या स्वरूपात मिळाले आहेत.

नाशिक जिल्ह्याने गेल्या आठवड्यात चलनटंचाई दूर करण्यासाठी तातडीने अडीचशे कोटी रुपयांच्या शंभर व पाचशेच्या नोटा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने दोनशे कोटी रुपये देण्याचे मान्य केले होते. दोन दिवसांपूर्वी 50 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा देणार असल्याचे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात 27 कोटी रुपयेच दिले आहेत. स्टेट बॅंकेकडे सध्या 224 कोटी रुपयांचे चलन उपलब्ध आहे. नाशिकमधील एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी शेवटी ग्रामीण भागातील शाखांमधून रोकड मागविली जात आहे. दोन दिवसांत उर्वरित रक्कम मिळणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत. रोज जिल्ह्याला 55 कोटींचे चलन अपेक्षित असते. आता नाताळची लगबग सुरू झाल्यापासून ती मागणी आणखी वाढणार आहे. पाचशेच्या नव्या नोटा चलनात वाढविल्याशिवाय सुट्या पैशांचा प्रश्‍न मिटणार नाही, असे सातत्याने सांगितले जात असताना त्या नोटा मात्र अजूनही बाजारात येण्याचे नाव घेत नाहीत. ज्यांना मिळाल्या त्यांनीही त्या जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे व्यवहारात दोन हजारांची नोट दिल्यास सुटे कोठून देणार, ही समस्या कायम आहे.

बॅग घेऊन जातात अन्‌ पोते भरून आणतात
हजार, पाचशेनंतर दोन हजारांच्या नोटांचीच सवय झालेल्या बॅंक अधिकाऱ्यांना आपल्या बॅंकेसाठी लाखोंची रोकड नेताना साधी बॅगही पुरेशी होत असे. मात्र आज दहा, वीस, पन्नास व शंभराच्या जुन्या नोटा उपलब्ध झाल्यानंतर त्यांना बॅग बाजूला ठेवून पोत्यात भरून नोटा न्याव्या लागल्या. या नोटा एटीएममध्ये भरता येत नाहीत. कारण त्या भरल्यास एटीएम मशिनच खराब होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे बॅंकेत पैसे काढण्यासाठी येणाऱ्यांच्या हातावरच या जीर्ण नोटा टेकवल्या जाणार आहेत. यातील काही नोटा 20 ते 25 वर्षांपूर्वीच्या आहेत. त्या नोटा बऱ्याच वर्षांत नागरिकांनी पाहिलेल्याही नाहीत. त्या पुन्हा चलनात आल्यावर त्या खऱ्या की खोट्या, असा संभ्रम निर्माण होत आहे.

Web Title: Old 27 million of notes