तरुणासह वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू

Gajanan-Tembhurne
Gajanan-Tembhurne

जळगाव - जळगाव जिल्ह्यातील तापमानाने कहर केला असून, आज तापमान ४५ अंशांवर जाऊन पोहोचले. कडक उन्हाच्या फटक्‍याने आज शहरात दोघांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. पहिल्या घटनेत वृद्ध प्रवाशाचा रेल्वेस्थानकावरच कोसळून मृत्यू झाला; तर दुसऱ्या घटनेत शहरातील कंजरवाड्याजवळ भरउन्हात दुचाकीवरून कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. 

मुंबईतील सांताक्रूझ येथील रहिवासी मुन्नालाल बाबूलाल वर्मा (वय ६०) हे मुंबईकडे जाणाऱ्या सुपरफास्ट एक्‍स्प्रेसमध्ये प्रवास करीत होते. दुपारी तीनच्या सुमारास जळगाव रेल्वेस्थानकावर गाडी आल्यानंतर दारातच उभे असलेले वर्मा दोन नंबर फलाटावर उतरले आणि चक्कर येऊन कोसळले. तत्काळ जीआरपी पोलिसांनी १०८ ॲम्बुलन्सला कॉल केला. मात्र, तासभर ॲम्बुलन्स येऊच शकली नाही. अखेर रावेर ग्रामीण रुग्णालयाच्या ॲम्बुलन्सद्वारे त्यांना जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, डॉक्‍टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले. 

दुसऱ्या एका घटनेत शहरातील जलारामनगर येथील रहिवासी गजानन केशव टेंभुर्णे (वय ३५) हे पाचोरा येथे नातेवाइकाच्या लग्नासाठी गेले होते. तेथून दुचाकीवर परतताना शहरातील कंजरवाड्याजवळील वखारीसमोर अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. सामाजिक कार्यकर्ता प्रमोद झवर यांनी बेशुद्धावस्थेत गजानन टेंभुर्णे यांना रिक्षातून जिल्हा रुग्णालयात आणले. तपासणी अंती डॉक्‍टरांनी त्यांनाही मृत घोषित केले. 

उष्माघाताचेच बळी 
जळगावात तापमानाने आज उच्चांक गाठला होता. चक्कर येऊन खाली कोसळलेल्या दोघांना जिल्हा रुग्णालयात आणल्यावर डॉक्‍टरांनी मृत घोषित केले. उन्हाचा फटका बसल्यानेच दोघांचा मृत्यू ओढवल्याची शक्‍यता डॉक्‍टरांनी वर्तवली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com