Old Pension Scheme : निवेदने, निदर्शने; जिल्ह्यात जुन्या पेन्शनसाठी आक्रोश... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

old pension scheme government employees on strike nandurbar news

Old Pension Scheme : निवेदने, निदर्शने; जिल्ह्यात जुन्या पेन्शनसाठी आक्रोश...

नवापूर (जि. नंदुरबार) : समान काम, समान वेतन, सर्वांना हवी एक पेन्शन, जुनी पेन्शन योजना, निवृत्तीनंतर पेन्शन हा आमचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे. (old pension scheme government employees on strike nandurbar news)

जुन्या पेन्शनबाबत नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी

जुन्या पेन्शनबाबत नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी यांना निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी

जुनी पेन्शनच्या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी मंगळवार (ता. १४)पासून राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपात उतरले आहेत. याबाबत मंगळवारी तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांना विविध संघटनांतर्फे निवेदन देण्यात आले.

संपात उतरलेल्या संघटनांच्या कर्मचाऱ्यांचे जिव्हाळ्याची व सामुदायिक मागणी जुनी पेन्शन याबाबत निवेदनात म्हटले आहे, की पश्चिम बंगाल, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, पंजाब आणि आता हिमाचल प्रदेश या राज्यांतील सरकार जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करून कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असताना महाराष्ट्रील राज्य सरकार याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

ज्यातून राज्यातील कर्मचाऱ्यांचा शासनावरील विश्वास उडाला असून, शासनाविषयी प्रचंड रोष निर्माण झाला आहे. जोपर्यंत शासन महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ व नंतर नियुक्त सर्व कर्मचान्याना १९८२ व १९८४ ची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू करीत नाही तोपर्यंत बेमुदत संप करण्याचा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. संपात महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना सक्रिय सहभागी झाली आहे.

महाराष्ट्र राज्य, सरकारी व निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने जुनी पेन्शन योजना व इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून बेमुदत संप जाहीर केलेला आहे. याबाबतचे निवेदन नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी व गटविकास अधिकारी चंद्रकांत माळी यांना महाराष्ट्र राज्य, सरकारी व निमसरकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वय समितीने जुनी पेन्शन योजना कर्मचारी यांनी दिले.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

सकाळी सर्व तहसील कर्मचारी, पंचायत समिती कर्मचारी तहसील कार्यालयासमोर घोषणाबाजी करत बेमुदत संपावर बसले आहेत. तहसील कर्मचारी, पंचायत समितीचे विविध विभागाचे कर्मचारी, प्राथमिक शिक्षक आदी कर्मचारी बेमुदत संपावर आहेत. नंदुरबार जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटना व नंदुरबार जिल्हा टीडीएफ संघटनेचे नवापूर तालुका माध्यमिक शिक्षक संघ व नवापूर तालुका टीडीएफ संघटना समन्वय समितीचा घटक असल्याने या संपात सहभागी आहेत.

निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील, टीडीएफचे तालुकाध्यक्ष विनायक सूर्यवंशी, उपाध्यक्ष सुधाकर सोनवणे, लेनिन पाडवी, कार्यवाह बळिराम आढाव, कार्यध्यक्ष हेमंत पाटील, अर्जुन बोरद, महिला आघाडीप्रमुख वैशाली पाटील, सुनीता बंजारा, प्राथमिक शिक्षक अनिल पाटील, राहुल साळुंखे, आनंद अहिरे, निंबाजी नेरे, किरण टिभे, मिलिंद निकम यांच्यासह तालुक्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सहभागी संघटना :

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, सरकारी निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समिती, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना,

सरकारी वर्ग ‘ड’ कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, माध्यमिक शिक्षक संघटना, टीडीएफ, प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समिती, प्राथमिक शिक्षक समिती, जुनी पेन्शन हक्क समिती, महाराष्ट्र राज्य शासकीय, निमशासकीय, लिपिक संवर्गीय हक्क परिषद, माध्यमिक शिक्षकेतर कर्मचारी संघटना, एनपीएसधारक व कंत्राटी कर्मचारी कृती समिती.

शहाद्यात पालिका शिक्षकांचा पाठिंबा

राज्य समन्वय समितीने आयोजित केलेल्या बेमुदत संपास शहादा पालिका शिक्षकांनी जाहीर पाठिंबा दिला असून, या संदर्भात पालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य पालिका व महापालिका शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांनी या संपास जाहीर पाठिंबा दर्शविला असून, विद्यार्थिहिताच्या दृष्टीने शैक्षणिक नुकसान होऊ न देता पेन्शन संदर्भात निर्णय होत नाही तोपर्यंत काळ्या फिती लावून अध्यापन करणार असल्याचे मुख्याधिकारी सिनारे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या वेळी ज्येष्ठ शिक्षक मुख्तार अन्सारी, रजेसिंग भिल, राजू डुडवे, कय्युम खान यांसह शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.

शहादा तहसील कार्यालयात निदर्शने

जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी येथील तहसील कार्यालयासमोर शहादा तालुका माध्यमिक शिक्षक संघ व शिक्षक लोकशाही आघाडी, महसूल कर्मचारी आणि माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे निदर्शने करण्यात येऊन तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर संघटना समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या माध्यमातून राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त राज्य सरकारी, निमसरकारी व इतर विभागांतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना एनपीएस रद्द करून जुनी पेन्शन योजना पुन्हा पूर्ववत लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी व इतर मागण्यांसाठी मंगळवारी येथील तहसील कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांना मागण्यांचे निवेदन दिले.

या वेळी शहादा तालुका माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागेश पटेल, शिक्षक लोकशाही आघाडीचे तालुकाध्यक्ष अजबसिंग गिरासे, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे रावसाहेब पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे किरण पाटील, जुनी पेन्शन योजनेचे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांसह सतीश पाटील, अंबालाल पाटील, किरण सोनवणे, बद्रीनाथ पाटील, दिनेश पाटील, हंसराज पाटील, घनश्याम पाटील यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तलाठी, महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.