Anandacha shidha : सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कष्टकऱ्यांना आनंदाचा शिधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

On occasion of Gudi Padwa distribution program of Anand Cha Shidha was held nandurbar news

Anandacha shidha : सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी कष्टकऱ्यांना आनंदाचा शिधा

नंदुरबार : गरीब,कष्टकरी, शेतकऱ्यांचा सणाचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी शासनामार्फत ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्यात येत असल्याचे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित (Vijayakumar Gavit) यांनी केले. (On occasion of Gudi Padwa distribution program of Ananda Cha Shidha was held nandurbar news)

नंदुरबार व चौपाळे येथे गुढीपाडव्यानिमित्त बुधवारी (ता. २२) ‘आनंदाचा शिधा’ वाटप कार्यक्रम झाला. त्या वेळी पालकमंत्री डॉ. गावित बोलत होते. या वेळी खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषदेच्या कृषी सभापती हेमलता शितोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य सागर तांबोळी, तहसीलदार भाऊसाहेब थोरात, सरपंच नामदेव भिल (चौपाळे) आदी उपस्थित होते.

या वेळी बोलताना मंत्री डॉ. गावित म्हणाले, की राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना आगामी गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आदी सणांनिमित्त ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. हा आनंदाचा शिधा गुढीपाडवा या मराठी नववर्षापासून वितरित करण्यात येणार आहे.

शासन वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गोरगरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांना मदत करत आहे. नुकतेच अंगणवाडीसेविका, मदतनीस, तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या रकमेत वाढ केली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी ‘महिला सन्मान योजना’ सुरू केली असून, या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासभाड्यात महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आली असून, या योजनेला राज्यात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. महिलांसाठी लवकरच स्वतंत्र महिला धोरण राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

खासदार डॉ. हीना गावित म्हणाल्या, की गुढीपाडवा व आगामी येणारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण गोरगरिबांना आनंदाने साजरे करता यावेत, या सण-उत्सवांच्या काळात गोरगरिबांना गोड करता यावे यासाठी शासनाने आनंदाचा शिधावाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

केंद्र सरकारमार्फत गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत दोन वर्षांपासून मोफत अन्नधान्य देण्यात येत असून, हे कोरोना काळापुरताच मर्यादित न ठेवता जोपर्यंत गोरगरिबांचे कोरोनाकाळातील संकट दूर होत नाही तोपर्यंत गरीब कल्याण योजनेंतर्गत मोफत रेशन धान्य देणार येणार आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

असा असेल ‘आनंदाचा शिधा’

जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब, तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्यरेषेवरील (एपीएल) केशरी शेतकरी शिधापत्रिकाधारकांना प्रत्येकी एक किलो या परिमाणात रवा, हरभराडाळ, साखर व एक लिटर या परिमाणात पामतेल हे शिधाजिन्नस देण्यात येणार आहेत.

हा ‘आनंदाचा शिधा’ गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी गुढीपाडवा या मराठी नवीन वर्षापासून ई-पॉस प्रणालीद्वारे १०० रुपये प्रतिसंच या सवलतीच्या दराने वितरित करण्यात येणार आहे. सर्व अंत्योदय आणि प्राधान्य कुटुब योजनेच्या शिधापत्रिकाधारकांनी त्यांना जोडून दिलेल्या रास्तभाव दुकानात ई-पॉस मशिनवर आपला अंगठा प्रमाणित करून शिधाजिन्नस संच प्राप्त करून घ्यावे.