सोनई हत्त्याकांडातील आणखी एकाची प्रकृती बिघडली

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 जुलै 2018

नाशिक : राज्यभर गाजलेल्या सोनई (जि. अहमदनगर) हत्त्याकांडातील फाशीची शिक्षा झालेल्या आणखी एका आरोपीची प्रकृती बिघडली. त्यामुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करीत, नाशिकरोड पोलिसांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या "तमाशा'मुळे आरोपीला वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब झाला. अखेर कारागृह प्रशासनानेच आरोपीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. 

नाशिक : राज्यभर गाजलेल्या सोनई (जि. अहमदनगर) हत्त्याकांडातील फाशीची शिक्षा झालेल्या आणखी एका आरोपीची प्रकृती बिघडली. त्यामुळे नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी झटकून टाकण्याचा प्रयत्न करीत, नाशिकरोड पोलिसांवर ढकलण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या या "तमाशा'मुळे आरोपीला वैद्यकीय उपचार मिळण्यास विलंब झाला. अखेर कारागृह प्रशासनानेच आरोपीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले. 

सोनई दलित हत्त्याकांडातील फाशीची शिक्षा झालेला आरोपी प्रकाश विश्‍वनाथ दरंदले (39) यास गुरुवारी (ता.12) रात्री दहा-साडेदहा वाजेच्या सुमारास छातीत दुखू लागले. त्याची तक्रार त्याने कारागृह प्रशासनाकडे केली असता, त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे सोडून प्रशासनाने नाशिकरोड पोलिसांशी संपर्क साधला आणि आरोपीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जाण्यास सांगितले. कारागृह प्रशासनाकडून अचानकपणे आलेल्या अशा कामगिरीचा नाशिकरोड पोलीसांनी आश्‍चर्यच व्यक्त केली. कारागृहातील आरोपीला आरोग्यविषयक तक्रार असल्यास त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची जबाबदारी ही कारागृह प्रशासनाची असल्याचे नाशिकरोड पोलिसांनी स्पष्ट केले. तरीही कारागृह प्रशासनाने सदरची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला. 

अखेरिस नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्यासह अधिकारी नाशिकरोड कारागृहात आले आणि त्यांनी शिक्षेतील आरोपी कारागृहात असताना त्याच्यावर उपचाराची जबाबदारीही कारागृह प्रशासनाचीच असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर कारागृह प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा आरोपी प्रकाश दरंदले यास जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरोपी दरंदलेची तपासणी केली आणि प्रकृती साधारण असून त्यास सकाळी (ता.13) पुन्हा तपासणीसाठी आणण्याचे सांगून कारागृहात परत पाठविले. दरम्यान, पोलीस आणि कारागृह प्रशासनाच्या वादामध्ये सुमारे तास-दीड तासाचा कालावधी निघून गेला. दोन आठवड्यांपूर्वीच सोनई हत्त्याकांडातील आरोपी पोपट उर्फ रघुनाथ विश्‍वनाथ दरंदले (55) यांचा गेल्या 23 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्‍याने निधन झाले होते. 

"डॉ. शिंदे' प्रकरणाचे सावट 
नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असताना डॉ. बळीराम शिंदे यांचा मृत्यु झाला होता. त्यासंदर्भातील प्रकरण "सकाळ'ने उजेडात आणल्याने कारागृहातील कैद्यांच्या आरोग्याचा प्रश्‍न चव्हाट्यावर आल्याने त्याच सावटातून अद्याप कारागृह प्रशासन सावरलेले नाही. त्यामुळे आरोपी कैद्याच्या उपचाराची जबाबदारी पोलिसांवर ढकलण्याचा केविलवाणा प्रयत्न कारागृह प्रशासनाने करून पाहिल्याची चर्चा आहे. 

शिक्षेचा आरोपी आजारी असेल तर त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेण्याची जबाबदारी कारागृह प्रशासनाची आहे, पोलिसांची नाही. पोलिसांकडून संरक्षण पुरविले जाईल परंतु आरोपीची जबाबदारी ही कारागृहाचीच राहील. 
- पंढरीनाथ ढोकणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नाशिकरोड पोलीस ठाणे

Web Title: One accused in Sonai murder case admitted in hospital