"एसटी'चे रोज दीड लाखावर "पाणी'! 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 नोव्हेंबर 2019

जळगाव- औरंगाबाद मार्गावर तब्बल 24 फेऱ्या रद्द आणि प्रवासी संख्या कमी झाल्याने जळगाव विभागाला रोजच दीड लाखाचे नुकसान सहन करावे लागत आहे. 

जळगाव -  जळगाव- औरंगाबाद महामार्गाची दुरवस्था साऱ्यांसाठी दुखणे झाली आहे. या दुखण्याचा अधिकचा फटका राज्यमार्ग परिवहन महामंडळाला बसत आहे. मुळात या मार्गावरून जाणाऱ्या बसच्या नुकसानीसह चालक- वाहकांना लागणाऱ्या दुखण्यामुळे सेवा बजावण्यात माघार घेतली जात आहे; तर जळगाव- औरंगाबाद मार्गावर तब्बल 24 फेऱ्या रद्द आणि प्रवासी संख्या कमी झाल्याने जळगाव विभागाला रोजच दीड लाखाचे नुकसान सहन करावे लागत आहे. 

औरंगाबाद- जळगाव महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाचे चुकीचे नियोजन झाल्याने तो दोन्ही बाजूंनी खोदण्यात आला आहे. यामुळे महामार्गाची पूर्णतः चाळण झाली आहे. यावरून चारचाकीच नव्हे; तर दुचाकीही चालविणे कठीण बनले आहे. दोन वर्षांपूर्वी औरंगाबादपासून काम सुरू झाले असताना, ते अद्याप "जैसे थे'च आहे. यामुळे जळगाव- औरंगाबाद अंतर पार करण्यास तीन तास लागत असताना, आता सहा ते साडेसहा तास लागतात. मुसळधार पावसामुळे तर महामार्गाची अवस्था अधिकच बिकट झाल्याने तेथून वाहन नेणे म्हणजे चालकाची कसरत आहे. ही रोजची कसरत महामंडळाच्या बसचालकांना करावी लागत आहे. याचा फटकाही महामंडळाला बसत आहे. 

फॉर्म्युला ठरला! मुख्यमंत्रीपद नाही पण एवढी मंत्रीपदे सोडण्यास भाजप तयार?

42 पैकी केवळ 18 फेऱ्या 
जळगाव- औरंगाबाद मार्गावर जळगाव विभागातून रोज 42 फेऱ्या केल्या जात होत्या; परंतु मार्गाच्या दुरवस्थेमुळे चालक- वाहकही जाण्यास तयार नसतात. अपेक्षित प्रवासीदेखील मिळत नसल्याने महामंडळाला फेऱ्या कमी कराव्या लागल्या आहेत. जळगाव विभागाकडून जाणाऱ्या 42 पैकी 24 फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून, सद्यःस्थितीत केवळ 18 फेऱ्या सुरू आहेत. शिवाय, जामनेरकडे जाणाऱ्या फेऱ्यांवरही याचा परिणाम झाला आहे. फेऱ्यांची संख्या घटल्याने महामंडळाला रोज दीड लाखाचे नुकसान सहन करावे लागत आहे. 

‘महा’चक्रीवादळ किनारपट्टीला धडकणार

"शिवशाही'ही कमी 
जळगाव विभागाला दिवाळीत सर्वाधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी जळगाव- पुणे मार्गावरील जादा फेऱ्या अधिक उपयुक्‍त ठरत असतात; परंतु औरंगाबाद मार्गामुळे ही परिस्थिती बदलली आहे. पुणे येथे जाण्यासाठी महामंडळाच्या बसदेखील चाळीसगावमार्गे सोडल्या जात आहेत. यात "स्लीपर कोच' असलेल्या शिवशाही बसदेखील कमी झाल्या आहेत. जळगाव विभागासाठी नवीन दहा शिवशाही बस देण्यात येणार होत्या. मात्र, महामार्गाच्या खराब अवस्थेमुळे दोनच शिवशाही बस मागवाव्या लागल्या. मुळात चाळीसगावमार्गे जाणाऱ्या बसफेऱ्यांचे भाडे अधिक लागत असल्याने प्रवासीदेखील जात नाहीत. 

औरंगाबाद महामार्गाची खराब अवस्था असल्याने फेऱ्या कमी कराव्या लागल्या. शिवाय, दिवाळीच्या हंगामात मिळणाऱ्या उत्पन्नावरदेखील परिणाम होऊन जळगाव विभागाला रोजचा दीड लाखाचा फटका बसत आहे. 
- राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, राज्यमार्ग परिवहन महामंडळ, जळगाव विभाग 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One and a half lakh every day Jalgaon Department loss