नाशिकमध्ये एक कोटींच्या जुन्या नोटा जप्त

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 11 एप्रिल 2017

नगर, नाशिकचे पाच जण ताब्यात; मुंबई नाका पोलिसांची कारवाई

नगर, नाशिकचे पाच जण ताब्यात; मुंबई नाका पोलिसांची कारवाई
नाशिक - द्वारका परिसरात जुन्या चलनातील नोटा बदलून घेण्यासाठीचा व्यवहार करण्यास आलेल्या पाच संशयितांकडून मुंबई नाका पोलिसांनी 99 लाख 95 हजार रुपयांच्या हजार-पाचशेच्या नोटा जप्त केल्या. ताब्यात घेण्यात आलेल्यापैकी तिघे नगर जिल्ह्यातील तर दोघे नाशिकमधील सुवर्ण व्यावसायिक आहेत.

मुंबई नाका पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक महेश हिरे यांना खबऱ्याकडून द्वारका परिसरात जुन्या नोटांच्या अदलाबदलीचा व्यवहार होणार असल्याची खबर मिळाली. त्यानुसार मुंबई नाका पोलिसांनी द्वारका परिसरामध्ये सापळा रचला होता. कृष्णा हनुमंत होळकर (वय 50, रा. गंगापूरगाव, ता. राहुरी, जि. नगर), सागर सुभाष कुलथे (वय 34, रा. द्वारका, नाशिक), शिवाजी दिगंबर मैंद (वय 45, रा. संगमनेर, जि.नगर), योगेश रवींद्र नागरे (वय 35, रा. द्वारका, नाशिक), मिलिंद नारायण कुलथे (वय 40, रा. संगमनेर, जि.नगर) अशी अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत. त्यांच्याकडून 99 लाख 95 हजार रुपयांच्या हजार व पाचशे रुपयांच्या जुन्या चलनातील नोटा जप्त केल्या आहेत. या प्रकरणाचा मुख्य संशयित कृष्णा होळकर आहे. त्याने संगमनेरच्या सुवर्ण व्यावसायिकाला जुन्या चलनातील नोटांच्या बदल्यात नवीन नोटा 20 ते 25 टक्‍क्‍यांच्या बोलीवर बदलून देण्याचे आमिष दाखविले होते.

Web Title: one crore old currency seized