नोकरीचा आनंद काळाने हिरावला....

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

दहीवड : नोकरी मिळवण्याचे स्वप्न पुर्ण झाले. हा आनंद गगनात मावेनासा होता मात्र, काळाने त्याच्या स्वप्नांवर घाला घालत नोकरीचा आनंद हिरावला. रामेश्वर (ता.देवळा) येथील सर्पदंशाने झालेल्या ईश्वर पगारच्या मृत्यूने रामेश्वर व देवळा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ही घटना रविवारी (ता.22) पहाटेच्या सुमारास घडली.

 

योगेश सोनवणे: सकाळ वृत्तसेवा

दहीवड : रामेश्वर येथे राहणारा ईश्वर पगार या २४ वर्षीय तरुणाने केबीएच. महाविद्यालयात बी फार्म चे शिक्षण पुर्ण केले. नंतर त्याने आपला मोर्चा स्पर्धा परीक्षांकडे वळवला. रेल्वे भरती मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याची तिकीट चेकर (टीसी) म्हणून निवड झाली होती. अमृतसर हे त्याच्या नियुक्तीचे ठिकाण ठरले होते. निवडी संदर्भातील पत्र रेल्वे भरती मंडळा मार्फत त्याला मेलद्वारे प्राप्तही झाले होते. ह्या निवडीच्या आनंदाने पगार कुटुंबियांमध्ये वेगळाच उत्साह होता. मात्र, काळाने त्याच्या आनंदावर घाला घातला.

रामेश्वर येथील विलास निंबा पगार यांची शेतजमीन आहे. त्यांचा मुलगा ईश्वर उर्फ सनी नेहमीप्रमाणे जेवण करून मळ्यातील गोठ्यात असलेल्या गायी गुरांचे राखण करण्यासाठी गेला होता. गायींना चारा टाकुन तो झोपण्यास गेला. झोपेत सर्पदंश झाल्याचे लक्षात न आल्यामुळे व निदान होऊ न शकल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर ईश्वरने रेल्वे भरती मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश संपादित करत चांगल्या पदाची नोकरी सुद्धा मिळवली होती. 1 ऑक्टोबरला अमृतसर येथे नोकरीसाठी जाणार असल्याने तो आनंदी होता. मात्र, क्षणात त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. रविवारी (ता.23)  शोकाकुल वातावरणात ईश्वरवर अंत्यसंस्कार करण्यात आले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one died of sneak bite in dahivad