अन् 'नाच्या'चा जमावाने 'खेळ मांडला'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

आश्वी (संगमनेर) - लांबसडक केस, सणसणीत उंचीला साजेशी स्त्रीदेहाची लकब, कोणीही प्रथमदर्शनी स्त्री म्हणून सहज फसावं असं रुप लाभलेल्या त्याने अंगात जन्मजात असलेल्या नृत्यकलेचा त्याने पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून स्विकार केला. स्त्रीवेश घेवून लोकांचे मनोरंजन करीत मिळालेल्या पैशावर मोठे कुटूंब पोसणाऱ्या लोककलाकाराला सोशल मिडीयाचा न सोसवणारा दणका बसला. स्त्री वेशातल्या पुरुषाला पाहून, गावातून मुलं पळवून नेण्यासाठी आलेला संशयित म्हणून त्याला भरपेट मार खावा लागल्याची घटना संगमनेर जवळील समनापूर येथे रविवार (ता. 17) रोजी घडली. आबा पांडुरंग शिंदे (वय 33) असे त्याचे नाव आहे.

सध्या सोशल मिडियावर मुले पळविण्याऱ्या टोळीबद्दलच्या अनेक पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. यामुळेच रविवारी आबा संगमनेर जवळील समनापूर येथे स्त्रीवेशात भिक्षा मागण्यासाठी गेला असताना, मुले पळविणाऱ्या टोळीतील तो असावा असा संशय एका युवकाला आला. त्याने फारशी विचारपूस न करता आबाला थेट मारहाण करण्यास सुरवात केली. या वाहत्या गंगेत अनेकांनी हात धुवून घेतले. तर काहींनी या घटनेचे लाईव्ह चित्रीकरण व्हॉटस्अॅपवर टाकले. हा व्हीडीओ पाहून, त्याच्या घरच्यांना मारहाणीची घटना समजली. तोपर्यंत संगमनेर शहर पोलिसांनी या प्रकरणी हस्तक्षेप केला होता.    

संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील आझादनगर भागात शिंदे कुटूंबिय सुमारे पन्नास वर्षांपासून रहिवासी आहे. वृध्द वडील, आई, पाच भावंडे, दोन बहिणी अशा मोठ्या कुटूंबातील आबा वयाच्या बाराव्या वर्षापासून तमाशात नाच्या म्हणून काम करीत आहे. बैठकीच्या, फडाच्या लावणीसह कोणत्याही गाण्यावर लिलया नृत्य करणाऱ्या आबाने, या कलेलाच उपजिवीकेचे साधन म्हणून स्विकारले. राज्यातील आघाडीच्या काळू बाळू, दत्तोबा तांबे, मंगला सातारकर अशा लोकनाट्यांसह इतर तमाशा फडातही त्याला मागणी असते.  तमाशाच्या स्टेजशिवाय इतर वेळी तो ऑर्केस्ट्रा, लग्नाच्या वराती, जागरण गोंधळात मुरळी अशा कार्यक्रमात नाचण्याचे काम करतो. तसेच संगमनेर तालुक्यातील गावे व आठवडे बाजारात आकर्षक पंजाबी ड्रेस किंवा साडी या वेशात भिक्षा मागतो यावर त्याच्या कुटूंबाचा चरितार्थ चालतो. 

केवळ सोशल मिडियावरच्या पोस्टमुळे आलेल्या या अनुभवाबद्द हळहळ व्यक्त करताना आबाला आपल्या भावना आवरल्या नाहीत. केवळ संशयावरुन निरपराधाला मारहाण करणाऱ्या विकृत जमावामुळे पारंपारिक कला जतन करणाऱ्या ग्रामीण कलाकारांची उपासमार होणार असल्याची भिती त्याच्या कुटूंबियांनी सकाळशी बोलताना व्यक्त केली.

सोशल मिडीयाचा मोठ्या प्रमाणावर वापर करणाऱ्यांनी कोणत्याही घटनेतील सत्यता पडताळून पहाणे गरजेचे आहे. अन्यथा जमावाच्या हातून खुनासारखा गंभीर गुन्हा घडल्याचे औरंगाबादच्या घटनेत समोर आले आहे. अशा प्रकारे पोटापाण्याचा व्यवसाय करणाऱ्या कलाकारांनी याची पूर्वकल्पना गावातील जबाबदार व्यक्ती अथवा पोलिस पाटील यांना देणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसेल.
- सुनिल पाटील (पोलिस निरीक्षक, संगमनेर शहर पोलिस ठाणे)

Web Title: one innocent man beaten by plople