पल्लवीच्या स्टार्ट अपला मिळाले एक कोटीचे भांडवल 

पल्लवीच्या स्टार्ट अपला मिळाले एक कोटीचे भांडवल 

नाशिक - विणकरांचे दुःख अन्‌ कारागिरांच्या व्यथांचा जवळून केलेला अभ्यास... मंत्राकडून तंत्रज्ञानाकडे झेपवणाऱ्या शहरात शिक्षण घेत लहानपणी बघितलेल्या व्यथा व वेदनांवर कायमची फुंकर मारली आहे, ती विणकर कुटुंबातून आलेली व मूळची नागपूर येथील पल्लवी मोहाडीकर या युवा उद्योजिकेने. पल्लवीने सुरू केलेल्या स्टार्ट अपने तब्बल एक कोटीचे भांडवल उभारले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, राजस्थानमधील विणकर, कारागिरांच्या कलाकुसरीच्या वस्तूंना "इंडोफॅश डॉट कॉम'च्या माध्यमातून जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून दिलीय. 

मूळची नागपूर येथील असलेल्या पल्लवी मोहाडीकरचे शालेय शिक्षण सिडकोतील लोकनेते व्यकंटराव हिरे विद्यालयात झाले. त्यानंतर आरवायके महाविद्यालयातून विज्ञान शाखेत शिक्षण घेतले. अभियांत्रिकीच्या शिक्षणासाठी तिने पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे (सीओईपी) गाठले. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस)मध्ये दोन वर्षे काम केले. 

आणखी पुढे शिकण्याच्या आवडीतून तिने आयआयएम, लखनौ येथून एमबीए शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेतला. एमबीएच्या दोन वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्र व उत्तर प्रदेशमधील काही वेळ तिने विणकर व या क्षेत्रातील कामगारांसोबत घालविला. जागतिक दर्जाच्या अन्‌ अत्यंत कुशल अशा त्यांच्या कारागिरीला अत्यल्प मोल मिळत असल्याचे तिच्या निदर्शनास आले. या अभ्यासादरम्यान लक्षात आले, की कारागिरांकडून काही मध्यस्थ, दलाल या कलाकुसरीच्या वस्तू कमी किमतीत घेऊन मोठी शहरे, परदेशांत जादा किमतीत विकतात. कारागिरांना थेट व्यासपीठ उपलब्ध नसल्याने व अज्ञानापोटी कारागिरांची मोठे आर्थिक नुकसान होत असल्याच्या निष्कर्षापर्यंत ती आली. 

आठ महिन्यांत उभारले कोटीचे भांडवल 

या कारागिरांच्या कलेला थेट व्यासपीठ उपलब्ध करून देता येऊ शकते, या संकल्पनेतून तिने डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट इंडोफॅश डॉट कॉम (www.indofash.com) या संकेतस्थळाला सुरवात केली. या वर्षी एप्रिलमध्ये इंडोफॅशच्या स्टार्ट अपला सुरवात केली. आयआयटी, पवईतील राहुल स्टार्ट अपचा सहसंस्थापक आहे. गेल्या चार महिन्यांत कर्नाटक, महाराष्ट्र व राजस्थान येथील विणकर, कामगारांपर्यंत पोचल्याने सुमारे दीडशे विणकर, कामगार, व स्वयंसेवी संस्थांशी ते जोडले गेले. इंडोफॅशकडे पंधरा हजारांहून अधिक उत्पादने आहेत. एकूण विक्रीपैकी 50 टक्‍के विक्री आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचत आहे. एंजल राउंडद्वारे शेखर साहू व नितेश पंत यांनी या स्टार्ट अपमध्ये ेएक कोटीचे भांडवल गुंतविले आहे. 

विणकर, कारागिरांच्या कलाकुसरीला मोबदला मिळवून देण्यासाठी आम्ही स्टार्ट अपला सुरवात केली. अल्पावधीत त्यास जागतिक स्तरावर चांगला प्रतिसाद मिळत असून, आणखी विणकर जोडून घेण्याचा आमचा मानस आहे. 

- पल्लवी मोहाडीकर, संस्थापक व सीईओ, इंडोफॅश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com