नाशिकसाठी एक हजार "बीपीओ'ला द्या गती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 मे 2017

खासदार गोडसे यांची एसटीपीआयकडे मागणी - इतर उद्योगांच्या गुंतवणुकीकडे वेधले लक्ष

खासदार गोडसे यांची एसटीपीआयकडे मागणी - इतर उद्योगांच्या गुंतवणुकीकडे वेधले लक्ष
नाशिक - माहिती व तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी केंद्रीय दळणवळण व तांत्रिक व्यवहार मंत्रालयातर्फे काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला नाशिकमध्ये एक हजार बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ) काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण त्यास आठ महिने उलटूनही अगदी संथगतीने कामकाज सुरू असल्याने या पार्श्‍वभूमीवर खासदार हेमंत गोडसे यांनी सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क्‍स ऑफ इंडियाचे अधिकारी डी. जी. रॉय यांची भेट घेऊन बीपीओच्या कामांना गती देण्याची मागणी आज केली.

बेंगळुरू, मुंबई व पुणे येथे आयटी उद्योगांना चालना मिळाली आहे. त्यानंतर टू टायर सिटीमध्येसुद्धा या उद्योगांना चालना मिळावी, यासाठी दळणवळण व तांत्रिक व्यवहार मंत्रालयाच्या इलेक्‍ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त सोसायटींतर्गत सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी पार्क्‍स ऑफ इंडियातर्फे निविदा काढण्यात आल्या होत्या. त्यात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला होता. त्या निविदेचा टाटा कन्सल्टन्सीला महाराष्ट्रात तीन हजार 900 पैकी एक हजार 860 जागांचा आय.पी.ए.देखील प्राप्त झाला. टीसीएसने नाशिकसाठी एक हजार बीपीओंचे काम पूर्ण करण्याचे नमूद केले होते. एक हजार बीपीओंची निर्मिती झाल्यास डेटा एन्ट्री व इतर आयटी उद्योग इंडस्ट्रीजला चालना मिळेल, असा दावा त्यांनी केला आहे. भांडवली पाठबळ, रोजगारनिर्मिती, स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे एक हजार बीपीओ स्थापन करण्याच्या कामाला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: one thousand bpo in nashik