एक हजार किलोमीटर सायकलिंगचा त्रिमूर्तींकडून विक्रम 

One Thousand Kilometres Cycling Record In Dhule
One Thousand Kilometres Cycling Record In Dhule

धुळे : एक हजार किलोमीटर सायकलिंगचा शहरातील त्रिमूर्तींनी विक्रम केला. विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनील नाईक, प्राचार्य जे. बी. पाटील, हवालदार दिलीप खोंडे यांनी ही कामगिरी केली. त्यांनी सुरत येथे आयोजित एक हजार किलोमीटरची सायकलिंग 'ब्रेव्हे' निर्धारित वेळेपेक्षा खूप आधीच पूर्ण करून खानदेशच्या सायकलिंग क्षेत्रात विक्रम स्थापित केला. 

आँडक्‍स फ्रान्स या सायकलिंग क्‍लबअंतर्गत जगभरातील 95 देशांमध्ये सायकलिंग स्पर्धा होतात. भारतात अनेक महानगरांमध्येही स्पर्धा होते. यात स्पर्धेचा सुरत ते अबूरोड आणि अबूरोड ते पुन्हा सुरत, असा एक हजार किलोमीटर मार्ग होता. धुळेकर सायकलिस्टने आतापर्यंत अधिकाधिक सहाशे किलोमीटरचा टप्पा गाठलेला आहे. परंतु, एक हजार किलोमीटरचे अंतर वेळेपूर्वीच पार करण्याचे आव्हान विख्यात स्त्रीरोग तज्ञ डॉ. सुनील नाईक, दिलीप खोंडे, प्रा. जे. बी. पाटील या त्रिमूर्तींनी लीलया पार केले. सायकलिंग क्षेत्रात खानदेशचे नाव देशपातळीवर झळकावले आहे. 

त्रिमूर्तींची कामगिरी -
साठवर्षीय डॉ. नाईक हे धुळे सायकलिस्टचे अध्यक्ष आहेत. अनेक वर्षांपासून निरोगी जीवनासाठी सायकलिंग करीत त्यांनी हजारो किलोमीटर सायकलिंग करीत याच वर्षी सुपर रेन्डोनर या पुरस्काराला गवसणी घातली. एक हजार किलोमीटर सायकलिंगसाठी डॉ. नाईक यांना 70 तास 15 मिनिटे लागली. पंचेचाळीस वर्षीय प्रा. जे. बी. पाटील हे शिरपूरस्थित आर. सी. पटेल टेक्‍निकल इंस्टीट्यूटचे प्राचार्य असून 2016 पासून त्यांनीही हजारो किलोमीटर सायकलिंग करीत याच वर्षी सुपर रेन्डोनर ही उपाधी प्राप्त केली आहे. त्यांनी एक हजार किलोमीटर अंतर 71 तास 15 मिनिटात पार केले. धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पन्नास वर्षीय हवालदार दिलीप खोंडे यांनी 71 तास 15 मिनिटात एक हजार किलोमीटरचा टप्पा पार केला. त्यांनी जलतरण स्पर्धांमध्ये वेळोवेळी सहभाग नोंदवून धुळ्याचे नाव देशात चमकविले आहे. या त्रिमूर्तींनी देशभरातील विद्यार्थी आणि सायकलिस्टपुढे आदर्श निर्माण केला आहे. त्यांनी हे यश धुळ्यात अपघाती निधन झालेले धुळे सायकलिस्टचे ज्येष्ठ सदस्य मंगेश वडगे यांना अर्पण केले आहे. 

फ्रान्सच्या स्पर्धेचा बहुमान -
त्रिमूर्तींनी एक हजार किलोमीटर टप्पा 75 तासांच्या आत पार केल्याने त्यांना फ्रान्समधील मानाच्या पॅरिस- ब्रेस्ट- पॅरिस या 2019 मध्ये होणाऱ्या बाराशे किलोमीटरच्या सायकलिंग स्पर्धेत सहभागी होण्याचा बहुमान मिळाला आहे. ऑलिंपिक स्पर्धेपूर्वी 1981 पासून सुरू झालेल्या आणि दर चार वर्षांनी होणाऱ्या पॅरिस- ब्रेस्ट- पॅरिस स्पर्धेत सहभागासाठी जगभरातील सायकलिस्ट आतुर असतात. त्यात धुळ्याचाही सहभाग राहणार असल्याने जिल्ह्याची कीर्ती सातासमुद्रापार जाणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com