आता गुरुवारी एकवेळ पाणीपुरवठा

आता गुरुवारी एकवेळ पाणीपुरवठा

नाशिक - भविष्यातील गरज ओळखून शहरात सुरू केलेली पाणीकपात किंचित मागे घेण्यात आली असून, आठवड्यातील दर गुरुवारी एकवेळ पाणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी गुरुवारी दिवसभर पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्याचा परिणाम दुसऱ्या दिवशी जलकुंभ भरत नसल्याने पुरवठ्यावर होत होता. महापौर रंजना भानसी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला.

अळीयुक्त पाण्यामुळे महापालिकेने दारणा धरणातून मे महिन्यापासून पाणी उचलणे बंद केले होते. त्याऐवजी गंगापूर धरणातून पाणी उचलले जात असल्याने धरणाच्या साठ्यात घट झाली. जूनमध्ये इंटेक वेलच्या न्यूनतम पातळीपर्यंत पोचल्याने चर खोदण्याची वेळ आली, तर त्याच वेळी पाऊस लांबल्याने भविष्याची गरज ओळखून प्रशासनाने पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला होता. महापौरांसह गटनेत्यांच्या बैठकीत हिरवा कंदील दाखविल्यानंतर ३० जूनपासून जेथे दोन वेळा तेथे एकवेळ पाणीकपात करण्यात आली, तर आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद करण्यात आला. या माध्यमातून दररोज ६० दशलक्ष लिटर, तर गुरुवारी पाणीपुरवठा बंद केल्यामुळे ४६० दशलक्ष लिटर पाणीबचतीचे नियोजन करण्यात आले. मात्र, त्याचदरम्यान पावसामुळे धरणाची पाणीपातळी वाढण्यास सुरवात झाली. त्यामुळे विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजपच्या नगरसवेकांनीसुद्धा गुरुवारचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. १९ जुलैच्या महासभेत पाणीपुरवठा फेरनियोजनाचा विषय पत्रिकेवर आहे. 

गुरुवारची कपात मागे घ्यायची आहे. मात्र, महासभेच्या दिवशी विरोधकांकडून याचे भांडवल होऊन श्रेय घेतले जाऊ नये यासाठी सोमवारी (ता. १५) आयुक्तांच्या दालनात बैठक झाली. महापौरांसह आमदार प्रा. देवयानी फरांदे, आमदार बाळासाहेब सानप, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, उपमहापौर प्रथमेश गिते, सभागृहनेते सतीश सोनवणे, भाजप गटनेते जगदीश पाटील, शिवसेना गटनेते विलास शिंदे, रिपाइंच्या दीक्षा लोंढे आदी उपस्थित होते. कपात लागू झाल्यापासून ते आतापर्यंत ७५ दशलक्ष घनफूट पाणीबचत झाल्याचा दावा प्रशासनाने केला. शहरासाठी रोज १५ ते १६ दशलक्ष घनफूट पाणी वाचविले जाते. त्यानुसार पाच दिवसांचे पाणी वाचले आहे.

पाणीकपात मागे घेण्यासाठी आमदार एकत्र आले, त्याप्रमाणे सत्ताधारी पक्षाने शहरासाठी आरक्षण वाढवून देण्यासाठीही शासनाकडे पाठपुरावा करावा.
- अजय  बोरस्ते, विरोधी पक्षनेते

जुन्या नाशिकवरून मतभेद
शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाल्यानंतर आमदार फरांदे यांनी जुन्या नाशिकमध्ये घरांत पाणी साठवणक्षमता कमी असल्याने दोनदा पाणीपुरवठा करण्याची मागणी केली. मात्र, आमदार सानप यांनी त्यास विरोध करत सर्वच भागात एकवेळ पाणीपुरवठ्याचा आग्रह धरल्याने त्यावरून दोन्ही आमदारांमधील मतभेद पुन्हा उघड झाले. पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी जुन्या नाशिकमध्ये पाण्याचा पुरवठा कमी होऊ न देण्याचे मान्य केल्यानंतर तेथेही एकवेळ पुरवठ्याचा निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com