व्यापार्‍याने शेतकर्‍यांना कांद्याचे दिलेले धनादेश झाले बाऊंन्स!

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 एप्रिल 2018

शेतकर्‍यांनी सहाय्यक निबंधकांना लेखी निवेदन देत संबंधित व्यापार्‍याने कांद्याचे पेमेंट रोख न दिल्यास 20 एप्रिल ला सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

येवला - शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या कांद्याच्या पैशापोटी दिलेले 45 शेतकऱ्यांचे धनादेश बाऊन्स झाले आहेत. बाजार समितीच्या अंदरसूल उपबाजार आवारातील व्यापार्‍याकडून आता रोख रक्कम देण्यास चालढकल होत असल्याने शेतकऱ्यांची फसवणुक झालेली आहे. पैसे मिळत नसल्याने या शेतकर्‍यांनी सहाय्यक निबंधकांना लेखी निवेदन देत संबंधित व्यापार्‍याने कांद्याचे पेमेंट रोख न दिल्यास 20 एप्रिल ला सहाय्यक निबंधक कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.

तालुक्यातील अंदरसूल, नगरसूल, तळवाडे, पांजरवाडी, धामणगाव, पाराळा, गारखेडा, देशमाने, उंदीरवाडी, ममदापूर, गवंडगाव, बोकटे, देवठाण, कोळम, पढेगाव, निमगाव मढ, दुगलगाव, अंगुलगाव आदी गावांमधील कांदा उत्पादक शेतकर्‍यांनी अंदरसूल उपबाजार आवारातील एका प्रतिष्ठीत कांदा व्यापार्‍याकडे फेब्रुवारी महिन्यात कांदे विक्री केले होते. या व्यापार्‍याने मालाचे पैश्याच्यापोटी सर्व 45 शेतकर्‍यांना धनादेशाद्वारे पेमेंट अदा केले होते. मार्च महिना अखेर सबंधित सर्व 45 शेतकर्‍यांचे धनादेश न वठल्यामुळे या शेतकर्‍यांनी भेट घेऊन विचारणा करण्याचा प्रयत्न केला मात्र शेतकर्‍यांना प्रत्यक्ष भेट टाळणे, व्यवस्थित उत्तरे न देणे असे वर्तन केल्याची तक्रार शेतकर्‍यांनी सहाय्यक निबंधकांना दिलेल्या निवेदनात केली आहे. 
या शेतकऱ्यांचे सुमारे साडे चौदा लाख रुपयाचे धनादेश वठविलेले नाहीत. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये भीतीदायक वातावरण आहे. कष्टाने पिकवलेल्या शेतमालाचे पैसे मिळाले नाही तर कसे होणार हा प्रश्न या शेतकऱ्यांना पडला आहे.

17 तारखेपर्यंत शेतकर्‍यांनी पैसे न मिळाल्यास अमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. सहाय्यक निबंधकांना दिलेल्या निवेदनावर जगन्नाथ एंडाईत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष श्रावण देवरे, भास्कर कदम, कैलास चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, संपत आहेर, पोपट बोरसे, सखाहरी जाधव, सखाहरी दाभाडे, नामदेव कदम, दिनकर भंडारी, साहेबराव संत्रे आदी कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या सह्या आहेत. सहाय्यक निबंधकांना दिलेल्या निवेदना बरोबर या शेतकर्‍यांनी सबंधित व्यापार्‍याने न वठविलेल्या धनादेशाची रकमेसह कांदा उत्पादक शेतकर्‍यांची नावे, गावे, दिनांक, मोबाईल क्रमांक याची सविस्तर यादी जोडलेली आहे. 

व्यापाऱ्याला बाजार समितीकडून नोटीस...
कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या मालाचे पेमेंट तसेच बाऊन्स झालेले धनादेशप्रश्नी बाजार समितीने 5 व 11 एप्रिलला या व्यापार्‍याला नोटीसा दिल्या आहेत. मार्च महिन्यानंतर बाजार समितीच्या अंदरसूल येथील उपबाजार आवारात लिलाव प्रक्रियेत बोली बोलण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. व्यापार्‍याने शेतकर्‍यांचे पैसे अदा न केल्यास संबंधित व्यापार्‍याचा कांदा खरेदीचा परवाना रद्द करण्यात येईल, अशी माहिती बाजार समितीच्या सभापती उषाताई शिंदे यांनी दिली.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The onion checks issued by the traders to the farmers were bounced