भाव नसल्याने पाच एकर कांदा जाळला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 फेब्रुवारी 2017

नगरसूल (जि. नाशिक) : शेतात पिकविलेला कांदा काढणी करून बाजारात विक्रीसाठी घेऊन जाणे परवडत नसल्यामुळे नगरसूल (ता. येवला) येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी पाच एकर क्षेत्रावरील काढणीस आलेले कांदा पीक मंगळवारी पेटवून दिले. या परिस्थितीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून संताप व्यक्त केला आहे.

सध्या कांद्याचे भाव शंभर रुपये क्विंटलपर्यंत घसरले आहेत. सरासरी दोनशे -तीनशे रुपये भाव मिळत असल्याने उत्पन्न तर सोडाच, पण निव्वळ उत्पादन खर्चही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. कृष्णा डोंगरे याने सात एकरांवर लाल कांद्याची लागवड केली. घरातील दागिने विकून लागवड, मशागत, खते यासाठी 50 हजार रुपये खर्च केले. 40 हजारांचे दागिने गहाण ठेवले, त्याचबरोबर वित्त कंपनीकडूनही दीड लाख रुपये कर्ज काढून कांदा पिकावर खर्च केले.

पीक येऊनही पदरात काहीच पडत नसल्याचे बघून त्यांचे हिरवे स्वप्न भंगले आहे. नोटाबंदीमुळे कांदा विक्रीनंतरही पैसे मिळत नाही. या परिस्थितीला वैतागून सरकारविरोधात संताप व्यक्त करून डोंगरे यांनी पाच एकरांतील उभ्या कांद्याला आग लावून पाचशे ते सहाशे क्विंटल कांदा नष्ट केला.

गेल्या तीन वर्षांपासून शेतीत उत्पादन नाही. औंदा चांगले पीक आले, पण शेतीमालाला भाव नाही. कांदे पिकवून आम्ही बरबाद झालो आहोत. गेंड्याची कातडी पांघरलेले हे सरकार याकडे डोळेझाक करीत आहे.
- कृष्णा डोंगरे, शेतकरी, नगरसूल (ता. येवला)
 
Web Title: onion crop set on fire in nashik