कांद्याच्या निर्यातीसाठी दुप्पट अनुदान

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 डिसेंबर 2018

नाशिक - उन्हाळ कांद्यापाठोपाठ नवीन कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यात अनुदानात दुप्पटीने वाढ केली आहे. योजना आयोगाच्या व्यापार-निर्यात अंतर्गत मंजूर केलेले प्रोत्साहन अनुदान 5 टक्‍क्‍यांवरून 10 टक्के करण्यात आले आहे. केंद्राच्या या धोरणामुळे नवीन कांद्याला चांगल्या भावाची अपेक्षा तयार झाली आहे.

केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांनी वित्तसहाय्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांना पत्र लिहिले होते. केंद्राने निर्यात अनुदानात केलेल्या वाढीमुळे पाकिस्तानसह अन्य निर्यातदार देशांच्या तुलनेत भारतीय कांदा स्पर्धा करण्यास मदत होणार आहे. याशिवाय नवीन वर्षामध्ये देशांतर्गतचा कांदा निर्यात झाल्याने स्थानिक मागणीच्या तुलनेत पुरवठा स्थिरावल्याने भाव सुधारण्यास मदत होणार आहे. नवीन कांद्याच्या भावात झालेल्या घसरणीमुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरुन सरकारच्या विरोधात रोष व्यक्त करण्यास सुरवात केली होती. शेतकरी-व्यापारी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, कृषिमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेऊन कांदा निर्यात अनुदानात वाढ करण्याची मागणी केली होती. त्याचवेळी मातीमोल भावाने विकल्या जाणाऱ्या कांद्यावर ट्रॅक्‍टर फिरवून शेतकऱ्यांनीदेखील कांद्याची निर्यात वाढवण्याचे धोरण स्वीकारावे असा आग्रह धरला होता.

Web Title: Onion Export Subsidy Double