कांद्यामुळे उत्पादकांच्या डोळ्यांत पाणी 

बुधवार, 27 मार्च 2019

देशातील कांदा उत्पादकांना डिसेंबर 2018 आणि जानेवारी 2019 या दोन महिन्यांत आवक झालेल्या कांद्याला मागील वर्षांच्या तुलनेत कमी भाव मिळाला.

नाशिक - देशातील कांदा उत्पादकांना डिसेंबर 2018 आणि जानेवारी 2019 या दोन महिन्यांत आवक झालेल्या कांद्याला मागील वर्षांच्या तुलनेत कमी भाव मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन महिन्यांत चार हजार कोटींचा दणका बसला. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणकारी मंत्रालयाच्या यंदाच्या पहिल्या प्राथमिक अंदाजाच्या अहवालातून ही माहिती पुढे आली. 

बाजारपेठांमध्ये मागील पाच वर्षांच्या तुलनेत 35 हजार 810 टनाने, तर जानेवारी 2018 पेक्षा दोन लाख 14 हजार टनाने अधिक म्हणजेच 13 लाख 22 हजार टन कांद्याची आवक जानेवारी 2019 मध्ये झाली. त्यास एक हजार 376 रुपये क्विंटल असा भाव मिळाला. जानेवारी 2018 मध्ये आवक झालेल्या 11 लाख सात हजार क्विंटल कांदा तीन हजार 514 रुपये क्विंटल भावाने विकला गेला. डिसेंबर 2018 मध्ये 11 लाख 10 हजार टन आवक झालेल्या कांद्याला एक हजार 331 रुपये क्विंटल, असा भाव मिळाला होता. 2013 ते 17 या पाच वर्षांत डिसेंबरमध्ये 11 लाख 11 हजार क्विंटलची आवक होऊन त्या वेळी हा कांदा तीन हजार 532 रुपये क्विंटल भावाने विकला गेला. या आकडेवारीवरून शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची स्थिती स्पष्ट होते. 

दहा राज्यांत 90 टक्के उत्पादन 
महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश, हरियाना, पश्‍चिम बंगाल, गुजरात आणि उत्तर प्रदेश या दहा राज्यांत देशातील एकूण उत्पादनापैकी 90 टक्के कांद्याचे उत्पादन होते. 2016-17 च्या तुलनेत 2017-18 मध्ये 3.72, तर 2018-19 मध्ये आदल्या वर्षीच्या तुलनेत 1.49 टक्के अधिक उत्पादन झाले. मात्र, 2018-19 मधील उत्पादन हे मागील वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या तुलनेत 12.48 टक्‍क्‍यांनी अधिक राहिले. 2013-14 ते 2017-18 मध्ये वर्षभर सरासरी देशात दोन कोटी दहा लाख टन कांद्याचे उत्पादन मिळाले. 2017-18 मध्ये दोन कोटी 32 लाख टन उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले. यंदाच्या पहिल्या प्राथमिक अंदाजानुसार दोन कोटी 36 लाख टनाचे उत्पादन अपेक्षित आहे. पण दुष्काळी परिस्थितीमुळे बसणाऱ्या पाणीटंचाईच्या झळांमुळे हा अंदाज कितपत तंतोतंत योग्य ठरणार याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. 

यंदा उत्पादनात घटीचा अंदाज 
गेल्या वर्षीप्रमाणेच 2013-14 ते 2017-18 या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा देशात कांद्याचे उत्पादन अधिक होण्याचा केंद्रीय कृषी मंत्रालयाचा अंदाज आहे. पण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कांद्याचे आगर असलेल्या महाराष्ट्र, गुजरातसह झारखंड, जम्मू-काश्‍मीर, मिझोराम, त्रिपुरा, केरळमध्ये कांद्याचे उत्पादन व राज्याच्या उत्पादनातील हिश्‍श्‍यात अंदाजात घट दर्शविण्यात आली आहे. महाराष्ट्रात 2017-18 मध्ये 88 लाख 54 हजार टन कांद्याचे उत्पादन झाले होते. पहिल्या अंदाजानुसार यंदा 84 लाख 74 हजार टनाचे उत्पादन अपेक्षित असून, उत्पादनातील हिस्सा आठ टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे.

Web Title: Onion got low prices