कांदा उत्पादकांच्या व्यथेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न 

कांदा उत्पादकांच्या व्यथेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न 

नाशिक - निफाड बाजार समितीत किलोला जेमतेम एक रुपया 40 पैसे भाव मिळाल्यामुळे उद्विग्न होऊन साडेसात क्विंटल कांद्याचे 1064 रुपये पंतप्रधान निधीला पाठविणाऱ्या शेतकऱ्याचे राजकीय लागेबांधे शोधण्याचा अयशस्वी प्रयत्न नाशिक जिल्हा प्रशासनाने केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पंतप्रधान कार्यालयाने अहवाल मागविल्यानंतर नाशिक- औरंगाबाद महामार्गावरील नैताळे गावातील संजय साठे नावाच्या शेतकऱ्याची कोण्या महसूल अधिकाऱ्याने भेट घेतली नाही. उलट, व्यापाऱ्यांकडे चौकशी करून त्यांचा कांदा दुय्यम दर्जाचा होता, असा अहवाल तयार केला. 

साठे यांनी 29 नोव्हेंबर रोजी कांदा विकून आलेली रक्‍कम मनिऑर्डरने पंतप्रधानांना पाठविली. त्यासाठी खिशातले 54 रुपये जास्तीचे खर्च केले. "सकाळ'ने ही बातमी प्रकाशित केल्यानंतर तिची दखल राष्ट्रीय स्तरावर सोशल मीडियाने घेतली. पंतप्रधान कार्यालयाने नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून वस्तुस्थितिजन्य अहवाल मागविला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथेची अशी पंतप्रधानांच्या कार्यालयाने दखल घेतल्यानंतर खरेतर प्रशासनातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साठे यांची भेट घेऊन दिलासा द्यायला पाहिजे होता. कांद्याला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांची जुनी मागणी आहे, तिचा विचार व्हायला हवा होता. परंतु, नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी चौकशीचे काम उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांच्यावर सोपविले. डॉ. मंगरुळे यांनीही केवळ फोनवर चौकशी करून सोपस्कार पार पाडले. 

दरम्यान, महसूल अधिकाऱ्यांनी नैताळे गावातील माजी सरपंच व अन्य लोकांकडे संजय साठे यांचे कोणत्या राजकीय पक्षांशी संबंध आहेत का, हे शोधण्यात अधिक रस दाखविल्याचा प्रकार बुधवारी उजेडात आला. साठे हे प्रयोगशील शेतकरी असून, परिसरातील शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज व अन्य बाबतीत मदतही करतात. नोव्हेंबर 2010 मध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुंबई भेटीवेळी सेंट झेवियर महाविद्यालयाच्या प्रांगणात त्यांना भेटलेल्या राज्यातील निवडक शेतकऱ्यांमध्येही त्यांचा समावेश होता, हे तपशील समोर आल्यानंतर प्रशासनाने चौकशीची दिशा निफाड बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडे वळविली. मुळात साठे यांनी विक्रीला आणलेला कांदा दुय्यम दर्जाचा होता, असे त्या व्यापाऱ्यांकडून वदवून घेतले आणि तसा अहवाल तयार केला. 

शेतकऱ्यांचे दुःख समजावे आणि त्यावर उपाययोजना केल्या जाव्यात म्हणून पंतप्रधानांना मनिऑर्डर केली होती, त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर उपाययोजना होणे अपेक्षित होते; पण अधिकाऱ्यांनी मित्रांकडून माझ्या राजकीय लागेबांध्यांची माहिती घेतली. त्यातून वेदना अधिक झाल्या आहेत. ही बाब संतापजनक आहे. 
- संजय साठे, कांदा उत्पादक, शेतकरी 

तलाठी आणि तहसीलदारांचा मला फोन आला होता. त्यांनी संजय साठेंची माहिती विचारली. त्यांना फोन नंबर दिल्यावर संजय साठे हे कुठल्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, अशी विचारणा त्यांनी केली. मग त्यावर संजय साठे हा शेतकरी माणूस असून, त्यांचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचे त्यांना सांगितले. 
- राजेंद्र बोरगुडे, माजी सरपंच, नैताळे 

शेतकऱ्याने कांदा विकून अल्प मोबदला मिळालेली रक्कम पंतप्रधान कार्यालयाला पाठविल्याचे प्रकरण पुढे आल्यावर प्रशासनाकडून चौकशी झाली हे खरे आहे. चौकशीमागे संबंधित प्रकार खरा आहे का, एवढेच जाणून घेण्याचा उद्देश होता. त्यामुळे प्रत्यक्ष घरी न जाता फोनवरून माहिती घेतली गेली. संबंधित शेतकऱ्याची राजकीय स्वरूपाची चौकशी केली हेही खरे नाही. राजकीय चौकशी करण्याचे काही कारण नाही. 
- राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी, नाशिक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com