भावात घसरण; कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा अडचणीत 

onion
onion

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) - भाव वाढण्याच्या आशेने कांदा चाळीवर हजारो रुपये खर्चून शेतकऱ्यांनी सांभाळलेला कांदा विविध कारणांमुळे नाइलाजास्तव विकावा लागत आहे. बाजारात सध्या कांद्यांना अपेक्षित भाव नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे अगोदरच अडचणीत सापडलेले शेतकरी आणखीनच अडचणीत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेता शासनाने कांद्याला हमी भाव द्यावा, अशी मागणी होत आहे. 

कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यात यंदा 8 हजार 36 हेक्‍टरवर कांद्याची लागवड झालेली होती. सध्या शेतकरी कांदा साठवणुकीच्या कामात व्यस्त आहेत. मेहुणबारेसह वरखेडे, तिरपोळे, जामदा, भवाळी, बहाळ, दरेगाव, लोंढे, पिंपळवाड म्हाळसा, उंबरखेडे आदी भागात कांदा काढणी सुरू आहे. यंदा खर्चही निघणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. 

भावात घसरण 
चाळीसगावसह उमराणे, मनमाड, पिंपळगाव, सटाणा, लासलगाव आदी ठिकाणच्या कांदा बाजारात उन्हाळी काद्यांची आवक वाढली आहे. प्रती क्विंटल 300 ते 600 रुपयांपर्यंतचा भाव सध्या मिळत आहे. कांदा लागवडीपासून मशागत, रोपे, खते, पाणी, मजुरी, वाहतूक, गोण्या, आडत, हमाली आदी सर्व खर्च पाहता, मिळणारा भाव समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणितच कोलमोडले आहे. पोटाला चिमटा देऊन कुटुंबासह सहा महिने शेतात राबराब राबणाऱ्या बळीराजाच्या कष्टाचे चीज होत नसल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अक्षरशः पाणी आणले आहे. 

वाढत्या तापमानाचा दुष्परिणाम 
गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणात उन्हाची तीव्रता कमालीची वाढली आहे. अशा वातावरणात कांदा चाळीतील कांदा सडण्याची शक्‍यता असल्याने बहुतांश शेतकरी कांदा चाळीत न ठेवता, बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत. मागीलवर्षी बऱ्याच शेतकऱ्यांचा कांदा चाळीतच सडला होता. त्यामुळे जो भाव मिळेल, त्या भावात विकून शेतकरी मोकळे होत आहेत. 

कांदाचाळ अनुदानाचा लाभ मिळावा 
आमदार उन्मेष पाटील यांच्या माध्यमातून तालुक्‍यातील कांदा उत्पादकांसाठी नुकतीच कांदाचाळ अनुदान सोडत काढण्यात आली. ही सोडत पारदर्शकपणे पार पडली असली तरी यात ज्यांना खरोखर कांदा चाळीची गरज आहे, अशा बऱ्याच शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळालेला नाही. कांदाचाळीची गरज पाहता, वंचित शेतकऱ्यांना त्याचा तातडीने लाभ मिळावा, अशी मागणी होत आहे. 

कांदाचाळ अनुदानाचे सन 2017-18 मध्ये 538 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 76 शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिलेला आहे. राहिलेल्या शेतकऱ्यांना पूर्वसंमती मिळाली असून, त्यांनाही लवकरच अनुदानाचा लाभ दिला जाईल. 
- एस. आर. चव्हाण, तालुका कृषी अधिकारी, चाळीसगाव. 

तालुक्‍याचे एकूण क्षेत्र
89,724 
कांदा लागवड क्षेत्र
8,036 हेक्‍टर 
कांद्यांचा भाव (क्विंटल)
300 ते 600

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com