भाव नाही वाढत पण कांद्यामुळे चिंता मात्र वाढतेय..!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 ऑगस्ट 2018

"खरीप कांदा पिकविणारा शेतकरी  अल्प शेती आणि अल्प पाणी असणारा असतो, या शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण लाल कांद्यावर अवलंबून असते. सद्या कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात खरिपाची लागवड कमी होणार आहे. उन्हाळ कांदा संपल्यावर लाल कांद्याला चांगला भाव मिळू शकतो, मात्र शेतकऱ्यांनी कर्ज पाणी करून अतिरिक्त लागवड करू नये. मागणी अन पुरवठ्याचे गणित शेतकऱ्यांनी समजून घ्यावे."
भागवतराव सोनवणे, संयोजक,जलहक्क समिती

येवला : चार पैसे मिळतील या अपेक्षेने चार-पाच महिन्यांपूर्वी हजारो रुपये खर्च करून चाळीत साठवलेला उन्हाळ कांदा आता चाळीत गुदमरून सडू लागला आहे. भावात ८०० ते ९०० रुपयांच्या पुढे वाढ होत नसल्याने व हा भाव परवडणारा नसल्याने शेतकरी चिंतातूर आहे. नवा लाल कांदाही बाजारात येऊ लागल्याने चाळीत कांदा ठेवावा कि नाही,भाव वाढतील का,आता विक्री केला अन उद्या भाव वाढले तर..असे प्रश्न शेतकऱ्यांची द्विधावस्था करत आहेत.

शेतकऱ्यांनी काढणी नंतर लागलीच मार्च ते मे मध्ये उन्हाळ कांदा सरासरी ६५०-७०० रुपयांनी विक्री केला होता. त्यावेळी कांदयाची प्रतही उत्तम होती तर वजनही भरघोस होते. मात्र मागील वर्षाप्रमाणे जुलै नंतर तेजी आली तर भाव दोन हजारांपर्यत जातील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी तेव्हा विक्री न करता कांदा चाळीत साठवला होता. तीन-चार महिने चाळीत साठवलेला कांदा आज विक्रीस आणला जात असल्यामुळे शेतकऱ्याला चार पैसे मिळावे ही रास्त अपेक्षा असते. मात्र मागील अनेक दिवसापासून ६०० ते ९५० रुपये प्रतिक्विंटल दरानेच विक्री होत आहे. त्यातच मागील आठवड्यात अचानक २०० रुपयांनी भाव कमी झाल्याने पुढे काय याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

चीन,कर्नाटकमधील कांद्याच्या अडचणी आणि राज्यातील खरीप पोळ कांद्याची लागवड लांबल्याने उन्हाळ कांदा येत्या काळात भाव खाणार असे जाणकार सांगत असले तरी भाव नाही पण चिंता मात्र वाढत आहे. कर्नाटक,आंध्र प्रदेशात नवीन कांद्याची आवकही सुरू झाली तर फलटण व लोणंद भागातील लाल कांदा १५ सप्टेंबरनंतर येईल. तर आपल्याकडे लाल कांद्याची विक्रमी लागवड होत असल्याने ऑक्टोबपर्यंत विक्रीला येणार आहे. त्यातच चाळीतला कांदा डागू लागल्याने आता चाळीत साठविलेला कांदा विक्रीला काढण्याशिवाय शेतकऱ्यांपुढे पर्याय राहिलेला नाही.
नव्याने कांद्याने बिघडवले गणित येथील बाजार समितीत ऊन्हाळ कांद्याची आवक अजून टिकून आहे. मात्र देशांतर्गत बाजारपेठेत स्थानिक कांदा दाखल झाल्याने बाजारभावात १०० ते २०० रुपये घसरण झाली. येथील कांद्याला देशांतर्गत उत्तर प्रदेश, बिहार, आसाम, दिल्ली, पंजाब, पश्चिम बंगाल राज्यात व परदेशात दुबई, मलेशिया, कोलंबो, बांगलादेश व सिंगापुर या ठिकाणी मागणी सर्वसाधारण होती. तर बाजारभाव ३०० ते १०७५ व सरासरी ९०० रुपये प्रति क़्विटल पर्यंत होते. अशी माहिती सचिव कैलाश व्यापारे यांनी दिली.

“दक्षिणेकडील नवा कांदा विक्रीला आला असून यामुळे आपल्याकडील कांद्याला इतर राज्यातील मागणी घटली आहे. आपल्याकडे अजून ४० ते ५० टक्के कांदा चाळीत आहे. हा विचार करता कांद्याला भाव वाढल्याने सरकारने मागील वर्षी हस्तक्षेप केला होता. आता भाव परवडनारे नसल्याने सरकारने हस्तक्षेप करून हमीभाव द्यावा.”
- भारत दिघोळे, अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटना

"खरीप कांदा पिकविणारा शेतकरी  अल्प शेती आणि अल्प पाणी असणारा असतो, या शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण लाल कांद्यावर अवलंबून असते. सद्या कांद्याचे भाव पडल्याने शेतकरी चिंतेत आहे. अनियमित पावसामुळे महाराष्ट्रात खरिपाची लागवड कमी होणार आहे. उन्हाळ कांदा संपल्यावर लाल कांद्याला चांगला भाव मिळू शकतो, मात्र शेतकऱ्यांनी कर्ज पाणी करून अतिरिक्त लागवड करू नये. मागणी अन पुरवठ्याचे गणित शेतकऱ्यांनी समजून घ्यावे."
भागवतराव सोनवणे, संयोजक,जलहक्क समिती

Web Title: onion prices issue farmers