सटाण्यात कांद्याला अवघा दीड रुपया भाव

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

सटाणा - येथील बाजार समितीत तालुक्‍यातील कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला बुधवारी प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावर दोन ट्रॅक्‍टर ट्रॉली कांदा फेकून तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. 

आज सकाळी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत लिलाव सुरू होताच बाजारभावात अधिकच घसरगुंडी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असतानाच कंधाणे येथील शेतकरी रवींद्र बिरारी व धांद्री येथील शेतकरी प्रशांत चव्हाण यांच्या नवीन कांद्याला प्रतिकिलो अवघा दीड रुपया भाव मिळाला. याच नवीन कांद्याला काल मंगळवारी (ता. ११) प्रतिक्विंटल साडेचारशे रुपये दर मिळाला असताना दुसऱ्या दिवशी प्रतिक्विंटल अवघा दीडशे रुपये दराचा पुकारा झाल्याने दोन्ही शेतकरी संतप्त झाले. त्यांनी कांद्याचे ट्रॅक्‍टर बाजार समिती बाहेर आणून विंचूर - प्रकाशा राज्य महामार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ सर्व कांदा रस्त्यावर ओतून दिला. सर्वत्र कांदा पसरल्याने महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आंदोलनात सहभागी घेत रास्ता रोको आंदोलन सुरू केले.

दुष्काळात मोठ्या कष्टाने कांदा पिकविला. आज बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या तीस क्विंटल कांद्याला प्रतिक्विंटल अवघा १५० रुपयेच भाव मिळाला. या तीस क्विंटल कांद्यासाठी वाहतुकीसह आम्हाला २४ ते ३० हजार रुपये खर्च आला. उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारभाव मिळत नसल्याने संतापून रस्त्यावर हा कांदा फेकावा लागला.
- रवींद्र बिरारी, कांदा उत्पादक शेतकरी, कंधाणे

खर्च २० हजार, मिळाले १३९३ रु.
बुधवारी सकाळी आव्हाटी (ता. बागलाण) येथील दीपक हिरामण खैरणार यांनी साडेपंधरा क्विंटल कांदा विक्री केल्यानंतर त्यांच्या कांद्यास प्रतिक्विंटल अवघा १०० रुपयेच भाव मिळाला. कांदा लागवडीसह खते, औषधे, फवारणी, आंतरमशागत, वाहतूक व इतर सर्व मिळून वीस हजार रुपये इतका खर्च आला. मात्र कांदा विक्रीतून त्यांना फक्त १५६० रुपये मिळाले आहेत. त्यात बाजार समितीने हमाली व तोलाईसाठी १६७ रुपये कापून घेतल्याने त्यांच्या हाती फक्त १३९३ रुपयेच हाती पडले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून, आजच्या आंदोलनात याचा प्रत्यय आला.

Web Title: Onion Rate Decrease