कांद्यामुळे रोज दहा कोटींचा दणका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

मुंबईमध्ये तेहतीसशे दर
मुंबईत क्विंटलभर कांद्याचा आजचा दर ३ हजार ३०० रुपये असा निघाला. बुधवारी (ता. ९) येथे ३ हजार ४०० रुपये दराने कांद्याची विक्री झाली होती. गेल्या चोवीस तासांत पिंपळगावमध्ये क्विंटलमागे २४४, चांदवडमध्ये २५०, येवल्यात ३००, लासलगावमध्ये ३०१, मुंगसेमध्ये ३५०, मनमाडमध्ये ४००, देवळा येथे २०० रुपयांनी दर घसरले आहेत.

नाशिक - कांद्याच्या दरात चोवीस तासांपूर्वी ३०० ते ४५० रुपयांची घसरण झाली. गुरुवारच्या (ता. १०) तुलनेत आज दर पुन्हा २०० ते ४०० रुपयांनी गडगडले. दरातील घसरणीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रोज दहा कोटींचा दणका बसत आहे. कांदा निर्यातबंदीच्या निर्णयामुळे अगोदर क्विंटलला एक हजाराने भाव गडगडले होते. त्यात सरासरी पावणेसातशे रुपयांची भर पडली.

किरकोळ आणि घाऊक व्यापाऱ्यांसाठी साठवणुकीचे निर्बंध केंद्र सरकारने घालून दिले आहेत. त्यामुळे व्यापारी कांदा खरेदीचा धोका पत्करत नाहीत.

त्यात किरकोळप्रमाणे घाऊक व्यापाऱ्यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील बाजारपेठेत दिवसाला साठ ते सत्तर हजार क्विंटल कांदा शेतकरी विक्रीसाठी आणीत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख बाजारपेठांचा कानोसा घेतल्यावर व्यापारी सरकारची नाराजी येऊ नये म्हणून जुजबी कांदा खरेदी करत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. काही व्यापाऱ्यांनी आपल्या पेढीची लिलावातील हजेरी कायम ठेवली असली, तरीही गेल्या आठ दिवसांपासून लिलावाकडे न फिरकणे पसंत केले आहे.

देशांतर्गत आजचा दर (क्विंटलला रुपयांमध्ये)
३४०० बंगळूर
३७०० चेन्नई
३६०० पाटणा
३३७५ सुरत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Onion rate Decrease