कांद्याच्या अनुदानासाठी लागणार 28 कोटी 

onion
onion

नाशिक - बाजारात घसरलेल्या बाजारभावाच्या पार्श्‍वभूमीवर सरकारने कांद्याला क्विंटलमागे शंभर रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. जुलै आणि ऑगस्टमध्ये बाजार समितीच्या आवारात विकलेल्या 200 क्विंटलपर्यंतच्या कांद्याला हे अनुदान मिळणार आहे. सरकारच्या धोरणानुसार सहकार विभागाने जिल्ह्यातील 15 बाजार समित्यांमधून माहिती संकलित केली असून, त्यानुसार कांद्याच्या अनुदानासाठी जिल्ह्याला 28 कोटींची आवश्‍यकता भासणार आहे. 

अनुदानाच्या धोरणानुसार 200 क्विंटलपर्यंत कांदा विकलेल्या शेतकऱ्यांची संख्या एक लाख 94 हजार 794 पर्यंत पोचली आहे. या शेतकऱ्यांनी 27 लाख 77 हजार 278 क्विंटल कांद्याची विक्री केली आहे. अनुदानासाठी निश्‍चित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना बाजारात क्विंटलला पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. पण, काढणीनंतरची साठवणूक, सडणे, वजनातील घट याचा विचार करता, विक्री झालेल्या या कांद्यापोटी शेतकऱ्यांना सर्वसाधारणपणे दीडशे कोटींचा दणका बसला आहे. एवढेच नव्हे, तर 50 टक्के सडलेला कांदा, साठवणुकीत आलेली घट आणि बाजारभावातील घसरणीच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांना 300 कोटींची झळ सोसावी लागली आहे. त्यामुळे सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेले अनुदान म्हणजे, "दात कोरून पोट भरणे' या उक्तीगत असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटली आहे. सद्यस्थितीत उन्हाळ कांद्याचा क्विंटलचा भाव 300 रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या नुकसानीत आणखी भर पडली आहे. 

शेतकऱ्यांकडून अर्जांची स्वीकृती 
जिल्हा उपनिबंधकांच्या पत्रानुसार बाजार समित्यांतर्फे शेतकऱ्यांकडून अनुदान मागणीचे अर्ज भरून घेण्यात येत आहेत. अर्जाबरोबर सात-बारा उतारा, बाजारात कांदा विकल्याच्या पावतीची प्रत आणि बॅंक खात्याची झेरॉक्‍स प्रत सोबत जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी चाळींमधील कांदा मिळेल त्या भावाला विकण्यास सुरवात केली आहे. कांदा सडून चाळींमध्ये दुर्गंधी पसरल्यास आणखी खर्चाचा भुर्दंड बसू नये म्हणून शेतकरी चाळींमधून कांदा उपसत आहेत. 

बाजार समिती शेतकरी संख्या कांद्याची विक्री (क्विंटलमध्ये) आवश्‍यक अनुदान (रुपयांमध्ये) 
नाशिक 38,271 2,13,047 2 कोटी 13 लाख 
लासलगाव 18,499 2,93,992 2 कोटी 94 लाख 
पिंपळगाव बसवंत 28,825 5,01,646 5 कोटी 02 लाख 
चांदवड 3,149 82,900 82 लाख 90 हजार 
दिंडोरी 3,100 87,553 87 लाख 55 हजार 
देवळा 3,398 73,480 73 लाख 48 हजार 
येवला 12,889 1,82,921 1 कोटी 82 लाख 
मनमाड 4,983 89,383 89 लाख 38 हजार 
नांदगाव 3,419 53,978 53 लाख 97 हजार 
मालेगाव 5,950 92,507 92 लाख 50 हजार 
सटाणा 8,143 1,57,155 1 कोटी 57 लाख 
सिन्नर 35,124 2,86,733 2 कोटी 86 लाख 
नामपूर 6,269 1,09,515 1 कोटी 09 लाख 
उमराणे 13,452 3,13,635 3 कोटी 13 लाख 
कळवण 9,323 2,38,829 2 कोटी 38 लाख 

""शेतकऱ्यांच्या उन्हाळ कांद्याचा भाव क्विंटलला एक हजार 600 रुपयांपर्यंत पोचला आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना प्रत्यक्षात मिळणारे अनुदान खूपच तोकडे आहे. त्यातच पुन्हा शेतकऱ्यांनी या महिन्यात कांद्याची विक्री केली असून, काही कांदा पुढील महिन्यात विकला जाणार आहे. तोही घसरलेल्या भावाने शेतकऱ्यांना विक्री करावी लागणार आहे. अशा कांद्याच्या अनुदानाचा प्रश्‍न प्रत्यक्ष खर्चाच्या तुलनेत सरकारने मार्गी लावणे अपेक्षित आहे.'' 
- नानासाहेब पाटील, संचालक, "नाफेड' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com