कांद्याची भाववाढ करणार वांदा 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 एप्रिल 2019

देशांतर्गतचा कांद्याचा भाव 
(क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये) 
- आग्रा - 750 - अलाहाबाद - 900 
- चंडीगड - 750 - चेन्नई - 1 हजार 100 
- हुबळी - 700 - मुंबई - 850 
- सूरत - 825 - दिल्ली - 640 

नाशिक - लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उन्हाळ कांद्याचा भाव क्विंटलला दोन हजार रुपयांपर्यंत पोचण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या महाराष्ट्रात यंदा पावणेचार लाख टनाने उत्पादन घटण्याचा अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून शेतकऱ्यांनी साठवणुकीवर भर दिला आहे. आर्थिक वर्षाखेरीस खरेदी बंद झालेली असताना लासलगावमध्ये क्विंटलला 750 रुपये मिळाले होते. आता हाच भाव 850 ते एक हजारांपर्यंत पोचला आहे. 

गेल्या दोन वर्षांत कांद्याला न मिळालेला भाव आणि यंदाच्या दुष्काळी परिस्थिती ही कारणे महाराष्ट्रातील कांद्याचे उत्पादन घटण्यामागील आहेत. गेल्यावर्षी राज्यात 88 लाख 54 हजार टन कांद्याचे उत्पादन झाले होते. यंदा प्राथमिक अंदाजानुसार 84 लाख 74 हजार टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित असले, तरीही प्रत्यक्षात पाण्याच्या उपलब्धतेअभावी किती उत्पादन मिळणार याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह कायम आहे. याशिवाय साठवणुकीत कांद्याचे नुकसान होत असताना साठवणुकीसाठी होणाऱ्या ग्रेडिंगमध्ये दहा टक्के कांदा शेतकऱ्यांना बाजूला काढावा लागतो. ही सारी परिस्थिती पाहता, बाजारातील कांद्याची आवक घटल्याने भाजप-शिवसेना नेत्यांच्या वांद्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लासलगाव बाजार समितीत काल 9 हजार 862 क्विंटल कांदा 851 आणि आज 6 हजार क्विंटल कांदा 870 रुपये क्विंटल अशा सरासरी भावाने विकला गेला आहे. याशिवाय आज राहुरीमध्ये 750, मनमाडमध्ये 810, पिंपळगाव बसवंतमध्ये 875, देवळ्यात 775 रुपये क्विंटल असा सरासरी भाव मिळाला आहे. 

उन्हाळ कांद्याचे यंदा उत्पादन घटण्याची चिन्हे असताना जिल्ह्याच्या बाजारपेठेत पंजाब आणि दिल्लीचे व्यापारी कांदा खरेदीसाठी दाखल झाले आहेत. मुळातच, जानेवारी 2018 च्या तुलनेत देशातील 90 टक्के कांद्याचे उत्पादन होणाऱ्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, गुजरात, हरियाना, कर्नाटक, राजस्थान, पश्‍चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशमधील बाजारपेठांमध्ये जानेवारी 2019 मध्ये आवक घटली होती. देशाला वर्षाला एक कोटी 70 लाख टन कांद्याची खाण्यासाठी गरज असते. यंदाच्या प्राथमिक अंदाजानुसार दोन कोटी 36 लाख टन कांद्याचे उत्पादन अपेक्षित असले, तरीही पाण्याच्या उपलब्धतेअभावी अंदाजाएवढे उत्पादन मिळण्याबद्दलचे प्रश्‍नचिन्ह तयार झाले आहे. 

देशांतर्गतचा कांद्याचा भाव 
(क्विंटलचा सरासरी भाव रुपयांमध्ये) 
- आग्रा - 750 - अलाहाबाद - 900 
- चंडीगड - 750 - चेन्नई - 1 हजार 100 
- हुबळी - 700 - मुंबई - 850 
- सूरत - 825 - दिल्ली - 640 

कांद्याच्या घटणाऱ्या उत्पादनाच्या पार्श्‍वभूमीवर "नाफेड'ला पन्नास हजार टन कांद्याची खरेदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्यक्षात मात्र "नाफेड'कडे असलेल्या मनुष्यबळाचा तुटवडा आणि साठवणुकीच्या सुविधेचा अभाव तेवढा कांदा खरेदी करून ग्राहकांना खूश करण्याची शक्कल अपयशी ठरणार आहे. 
- चांगदेवराव होळकर, "नाफेड'चे माजी अध्यक्ष 

Web Title: Onions may reach two thousand