जिल्हा रुग्णालयात उष्माघातासाठी एकच बेड! 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

जळगाव - शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या तापमानामुळे जणू उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहोचला असून, वाढत्या तापमानामुळे उद्‌भवणाऱ्या उष्माघाताची लक्षणे असलेले रुग्ण वाढत आहेत. मुख्य म्हणजे जिल्ह्यातून येणारे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होत असताना, येथे मात्र एकाच बेडची सुविधा करण्यात आली आहे. 

जळगाव - शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या तापमानामुळे जणू उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. तापमानाचा पारा 44 अंशांवर पोहोचला असून, वाढत्या तापमानामुळे उद्‌भवणाऱ्या उष्माघाताची लक्षणे असलेले रुग्ण वाढत आहेत. मुख्य म्हणजे जिल्ह्यातून येणारे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होत असताना, येथे मात्र एकाच बेडची सुविधा करण्यात आली आहे. 

उन्हाळ्याची सुरवात झाल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच जिल्हा रुग्णालय व महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू करण्यात येतो. उष्माघाताची काही लक्षणे आढळल्यानंतर संबंधित रुग्णास कक्षात दाखल केले जाते. त्यानुसार महापालिका व जिल्हा रुग्णालय प्रशासनातर्फे सुविधा करण्यात आली आहे. यंदाचे तापमान गेल्या आठवड्यापासून 44 अंशांवर स्थिर असून, उन्हाचा त्रास अनेकांना झाला आहे. जिल्ह्यात उष्माघाताचे आतापर्यंत तिघांचे बळी गेले असून, जिल्हा रुग्णालयात किंवा महापालिकेच्या शाहू रुग्णालयात उष्माघात किंवा त्याची लक्षण असलेल्या रुग्णांची नोंद अद्याप झालेली नाही. 

जिल्हा रुग्णालयात एकच बेड 
शहरासह जिल्ह्यातून उष्माघाताचा त्रास झालेले रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होत असतात. यासाठी जिल्हा रुग्णालयात सुविधा करण्यात आली असून, ती नावापुरती असल्याचे जाणवते. कारण, अतिदक्षता विभागातच "उष्माघात कक्ष' असे नाव देऊन केवळ एकाच बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. म्हणजे या ठिकाणी उष्माघाताचा त्रास झालेले दोन किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठीची सुविधा नसल्याचे पाहण्यास मिळाले. मुळात या ठिकाणी स्वतंत्र कक्ष उभारून तेथे डॉक्‍टरांचेदेखील पथक असणे आवश्‍यक आहे. 

महापालिका रुग्णालयात रुग्णच नाही 
महापालिकेच्या शाहू महाराज रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या उष्माघात कक्षात साधारणपणे सहा ते सात बेडची व्यवस्था करण्यात आली आहे, तसेच या कक्षाचे वातावरण थंड राहण्यासाठी त्या ठिकाणी कूलर लावण्याची व्यवस्थाही केली आहे. याशिवाय, कक्षात उष्माघाताच्या रुग्णांच्या तपासणीसाठी आवश्‍यक यंत्रसामग्री उभारण्यात आली असून, अन्य रुग्णालयांमध्येही प्राथमिक उपचारासाठी औषधी ठेवण्यात आल्या आहेत. तापमानाची तीव्रता मोठ्या प्रमाणात असतानाही उष्माघाताचे रुग्ण अद्याप आले नाहीत. केवळ उलट्यांचा त्रास झालेले रुग्ण आले असता, त्यांच्यावर उपचार करण्यात आल्याचे डॉ. रावलानी यांनी सांगितले. 

Web Title: Only one bed for heat in the district hospital