अवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात

अवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात

येवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील निमतानदार मुरलीधर शंकर ठाकरे यांच्या बाबतीत घडला आहे. अवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी ठाकरे नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या जाळ्यात अडकला.

येथील भूमिअभिलेख कार्यालयातील निमतानदार ठाकरे यांना सर्वे क्रमांक १८६ मधील मालमत्ता उतारा देण्यासाठी तक्रारदाराकडे शासकीय फी व्यतिरिक्त १८० रुपये अथवा एक कोऱ्या कागदाचा रिम मागणी केली. उतारा देण्यासाठी लाचेच्या स्वरूपात ही मागणी केल्याने तक्रारदाराने नाशिक लाचलुचपत विभागात तक्रार केली होती. त्यानुसार शुक्रवारी तहसील कार्यालयाच्या आवारातील भूमिअभिलेख कार्यालयात कोऱ्या कागदाचा २२० रुपयांचा एक रिम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने सापळा रचून ठाकरे यांना रंगेहाथ पकडले.

येथील कार्यालयात लाचलुचपतविरोधी पथकाकडून छापे टाकण्याचे प्रकार नागरिकाच्या जागरूकतेने वाढले आहे. प्रांताधिकारी, पोलीस, ग्रामसेवक, पंचायत समितीचा अभियंता यांच्या बाबतीत यापूर्वी अशी कारवाई झाली आहे.

तरीही शासकिय कर्मचारी सुधरायचे नाव घेत नसल्याने अश्या घटना घडत आहेत. विविध कामानिमित्त कार्यालयात येणाऱ्या नागरिकांकडून त्यांच्या कामाच्या बदल्यात सर्रासपणे दर ठरवून मलिदा लाटला जात आहे. काही ठिकाणी तर एजंट देखील नेमले गेले असून महसूलशी निगडीत कार्यालये, पोलिस व पंचायत समितीचे नाव याबाबतीत अधिक चर्चेत आहेत. अनेकाकडून याचे किस्से ऐकायला मिळत असून यातील तथ्य सोधत लाचलुचपत विभागाने लक्ष देऊन ठोस कारवाही करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत. तक्रारी नसल्या तरी खुलेआम मलिदा लाटण्याचे वाढलेले प्रकार पाहता यावर कारवाईची गरज व्यक्त होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com