नाशिकचे पाणी देण्यास विरोध

नाशिकचे पाणी देण्यास विरोध

नाशिक -  ‘पाणी नाही कोणाच्या बापाचे, ते तर आमच्या हक्काचे’, ‘सरकार हमसे डरती है, पोलिस को आगे करती है’ ‘धरण उशाशी कोरड घशाशी’, ‘पाणी चोरणाऱ्यांचा धिक्कार असो’, ‘दत्तक नाशिक वाऱ्यावर’ आदी घोषणांनी आज दुपारी रामकुंड परिसर दणाणून गेला.

या वर्षी पुरेसा पाऊस न झाल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच मराठवाड्यातील जायकवाडी धरणातील पाणी क्षमतेच्या ६५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी भरल्याने समन्यायी तत्त्वानुसार १७२ दशलक्ष घनमीटरची तूट भरून काढण्यासाठी गंगापूर, दारणा व मुळा धरण समूहातून ८.९९ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिकच्या जलसंपदा विभागाला दिले आहेत. या निर्णयाला सत्ताधारी भाजपव्यतिरिक्त सर्वपक्षीय राजकीय नेत्यांच्या कृती समितीने विरोध दर्शविला. पाणी सोडण्याच्या विरोधात सर्व विरोधी पक्षीय नेते आज गंगाघाटावर एकत्र आल्यानंतर त्यांनी रामकुंडावर आंदोलन सुरू केले. 

या धरणे आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. या वेळी पदाधिकाऱ्यांनी रामकुंडाच्या पाण्यात उतरून जोरदार घोषणाबाजी केली. नाशिककरांचे हक्काचे पाणी पळविणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याचा निर्धार केला.  

या वेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महापालिका विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगरप्रमुख महेंद्र बडवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, माजी खासदार देविदास पिंगळे, काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव, अशोक मूर्तडक आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत सरकारचा धिक्कार केला. नाशिकचे पाणी पळविण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही सर्वपक्षीय कृती समितीतर्फे देण्यात आला. 

भाजप पदाधिकाऱ्यांनी फिरविली पाठ
गंगापूरसह दारणा धरण समूहातून ८.९९ टीएमसी पाणी सोडल्यास नाशिककरांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे शहरासह जिल्ह्यात तीव्र असंतोष असताना, तसेच जिल्ह्यातील निम्म्यापेक्षा अधिक तालुके तहानलेले असताना सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी रामकुंडावरील आंदोलनाकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकविषयी भाजप पदाधिकाऱ्यांनी अशी नकारात्मकता दाखवायला नको होती, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्ष नेत्यांनी आंदोलनस्थळी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या दत्तक विधानानंतर नाशिककरांनी प्रथमच एका पक्षाला म्हणजे भाजपला मनपात स्पष्ट बहुमत दिल्यामुळे नाशिककरांचे हक्काचे पाणी सोडल्यास आगामी निवडणुकीत नाशिककर याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com