पुनंद धरण पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उच्च न्यायालयाचे नाशिक जिल्हाधिकार्‍यांना आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 मे 2019

  • पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
  • कार्यवाहीसाठी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे न्यायालयाचे जिल्हा पोलीस प्रमुखांना आदेश
  • ​योजनेसाठी पालिकेकडून निविदा व कार्यारंभ आदेश

सटाणा  : सटाणा शहराला वरदान ठरणार्‍या अत्यंत महत्वाकांक्षी पुनंद पाणीपुरवठा योजनेचे काम तात्काळ सुरू करावे आणि शासन आदेशातील मुदतीत पूर्ण करून याबाबतच्या कार्यवाहीचा अहवाल येत्या 14 जूनला सादर करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच या कार्यवाहीसाठी पोलिस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेशही न्यायालयाने जिल्हा पोलीस प्रमुखांना दिले आहेत.

शहरातील अॅड. रोशन (दीपक) नंदलाल सोनवणे यांनी सटाण्याच्या पाणीप्रश्नी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकाल दिला आहे. दरम्यान, या महत्वपूर्ण निकालामुळे पाणीपुरवठा योजनेला विरोध केल्यास नेते व ग्रामस्थांकडून थेट न्यायालयाचा अवमान होणार आहे. त्यामुळे योजनेच्या मार्गातील प्रमुख अडसर दूर होऊन योजना पूर्ण होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. 
सर्वोच्च न्यायालयाने 31 ऑक्टोबर 2018 ला पाणी ही कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्या आधाराने शहरातील अॅड. रोशन सोनवणे यांनी गेल्या 9 एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती.

याचिकेत महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, जिल्हाधिकारी नाशिक, जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुख, सनपा मुख्याधिकारी व ठेकेदार एम.टी.फड यांना प्रतिवादी करण्यात आले होते. अॅड.सोनवणे यांनी दाखल केलेल्या याचिकेत सटाणा शहरातील भीषण पाणीटंचाई आणि पुनंद पाणीपुरवठा योजनेच्या सद्यस्थितीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पुनंद धरणातील एकूण 39.99 दशलक्ष घनमीटर पाण्यातील केवळ 2.36 दशलक्ष घनमीटर पाणी सटाणा शहरासाठी 2031 पर्यंतच्या लोकसंख्येच्या गरजेनुसार आरक्षित आहे.

योजनेसाठी पालिकेकडून निविदा व कार्यारंभ आदेशदेखील काढण्यात आला आहे. शासनाकडून मंजूर 51 कोटी निधीतून 14 कोटी रुपयांचा पहिला हप्ताही पालिकेच्या खात्यावर वर्ग झाला आहे. पुनंद येथे जॅकवेल व फिल्टर प्लांटसाठी खरेदी केलेली जागा पालिकेच्या नावावर झाली आहे. 
परंतु योजनेस कळवण तालुक्यातील पुढारी व स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने विरोध होत असून जलवाहिनीऐवजी पाटाने किंवा नदीने पाणी नेण्याचा आग्रह धरला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे पालिकेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे योजनेच्या कामासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी देखील केली होती.

बंदोबस्त उपलब्ध होताच काम सुरू करण्यात आले, परंतु ग्रामस्थांच्या विरोधामुळे काम बंद पडल्याचे न्यायालयासमोर मांडण्यात आले. ॲड. सोनवणे यांच्यातर्फे अॅड. संजीव कदम व अॅड. महेंद्र संध्यानशीव यांनी काम पाहिले. तर अॅड. एन.एम.मेहरा यांनी सरकारची बाजू मांडली.
 
ता. 12 एप्रिलला झालेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाचे न्यायाधीश अभय ओक व न्यायाधीश एम.एस.संकलेचा यांनी तत्काळ सुनावणी घेऊन निर्णय घोषित केला. या प्रकरणाची सुनावणी करताना खंडपीठाने जिल्हाधिकारी व पालिका मुख्याधिकारी यांना योजनेचे काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच यासाठी गरजेनुसार पुरेसा बंदोबस्त देण्याचे निर्देशही जिल्हा ग्रामीण पोलीस प्रमुखांना खंडपीठाने दिले आहेत. खंडपीठाने शासन निर्णयानुसार मुदतीच्या आतच योजनेचे काम पूर्ण करण्याची सक्त ताकीद दिली आहे. तसेच याप्रकरणी झालेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल येत्या 14 जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

न्यायालयाच्या या निर्देशामुळे पुनंद पाणीपुरवठा योजनेस विरोध करणे म्हणजे न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्याने आता जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुखांकडून न्यायालयाच्या आदेशानुसार कामाच्या कार्यवाहीस केव्हा प्रारंभ होईल ? याकडे सटाणावासियांचे लक्ष लागून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Order to Nashik District Collector of High Court regarding Punand Dam Water Supply Scheme