दुकानाबाहेरील जाहिरात फलकांनी नागरिक त्रस्त!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

जळगाव - गोलाणी व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर बहुतांश मोबाईल दुकाने असून, दुकानाबाहेर तर जाहिरातीच्या फलकांचे जाळेच विणले गेल्याचे चित्र आहे. अनेक दुकानांबाहेर मोबाईल कंपन्यांकडून टाकून दिल्या जाणाऱ्या नावाचे काम पंधरा-पंधरा दिवस सुरू आहे. त्यामुळे दुकानासमोरील जागा व्यापली गेल्याने नागरिकांना जावे कुठून, असा प्रश्‍न ठाकला आहे.

जळगाव - गोलाणी व्यापारी संकुलातील पहिल्या मजल्यावर बहुतांश मोबाईल दुकाने असून, दुकानाबाहेर तर जाहिरातीच्या फलकांचे जाळेच विणले गेल्याचे चित्र आहे. अनेक दुकानांबाहेर मोबाईल कंपन्यांकडून टाकून दिल्या जाणाऱ्या नावाचे काम पंधरा-पंधरा दिवस सुरू आहे. त्यामुळे दुकानासमोरील जागा व्यापली गेल्याने नागरिकांना जावे कुठून, असा प्रश्‍न ठाकला आहे.

गोलाणी व्यापारी संकुलात मोठ्या प्रमाणात दुकानांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत; पण व्यवसायाच्या स्पर्धेत दुकानदार तसेच मोबाईल कंपन्यांच्या जाहिरातींचे फलक, कमानींनी गोलाणी संकुलातील नागरिकांना जाण्या-येण्याची जागाच व्यापली गेली आहे. त्यामुळे संकुलात येणाऱ्या ग्राहकांसह विविध कार्यालयांतील कर्मचारी व रहिवाशांना येण्या- जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच बेशिस्त लावलेली वाहने आणि जाहिरातींच्या कमानी, बोर्ड, कटआउटमुळे येणाऱ्या- जाणाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.

गाळ्याबाहेरील बांधकामांची डोकेदुखी
मोबाईल कंपनीकडून नामफलक तयार करून देण्याचे काम सुरू आहे. या कामांना पंधरा-पंधरा दिवस लागत असल्याने फलक व सुशोभीकरणाच्या कामांसाठी दुकानाबाहेर लावलेल्या बांबूच्या शेडचा त्रास ग्राहकांना तसेच इतर गाळेधारकांना होत आहे.

जाहिरातीच्या कमानींमुळे मार्ग बंद
गोलाणी संकुलातील मोबाईल दुकानदार ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी दुकानाबाहेर मोठमोठ्या विविध मोबाईल कंपन्यांच्या जाहिरातीचे एअर बलूनची कमान, लोखंडी पाइपपासून तयार केलेल्या कमानी दुकानाबाहेर लावलेल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जागा व्यापली गेल्याने संकुलात येण्या- जाण्यासाठी जागा राहत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.

अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्ष
याबाबत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. एका गाळेधारकांना एकच नामफलक लावण्याची परवानगी असताना, गाळेधारक दुकानाबाहेर मोठमोठ्या जाहिरातींच्या कमानी, बॅनर, कटआउट लावून अतिक्रमण करीत आहेत. शहरातील रस्त्यांवरील अतिक्रमण काढले जाते, तसेच संकुलातील अतिक्रमण काढावे, अशी मागणी तेथील रहिवाशांकडून होत आहे. 

गाळेधारकांना दुकानाच्या वर एकच नामफलक लावण्याची परवानगी आहे. त्यामुळे कमानी, एअर बलून कमानी तसेच कटआउट लावून अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करू.
- एच. एम. खान, अतिक्रमण अधीक्षक, महापालिका

Web Title: Outside the shops advertise the civilian plank