प्रेमीयुगुलांचे हक्काचे ठिकाण 'हे' बसस्थानक....बरेचं उपद्‍व्याप होतात इथे...

सकाळ वृत्तसेवा 
Tuesday, 10 December 2019

महाविद्यालयीन मुला-मुलींचे आणि प्रेमीयुगुलांचे हक्काचे ठिकाण, तर सायंकाळी मध्यपान करणाऱ्यांकरिता हक्काचे स्थान बनले आहे. यांसह परिसरात वाटेल तेथे शौचास जाणे, मार्बल ग्रेनाइटने बांधलेल्या वास्तूवर सर्रासपणे घाण टाकली असून, बसस्थानक खराब करण्यात आले आहे. स्थानकाच्या पाठीमागे मद्यपींकडून मद्याच्या बाटल्या तशाच टाकून दिल्या जात आहेत. त्यामुळे हे बसस्थानक आहे की मद्यपींचा अड्डा, अशीच स्थिती झाली आहे.

नाशिक : अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ओझरकरांचा नव्या बसस्थानकाचा प्रश्‍न मार्गी लागला; परंतु तेच बसस्थानक आता टवाळखोरांचे केंद्रबिंदू बनले आहे. त्यामुळे या चांगल्या बसस्थानकाचे विद्रुपीकरण होऊ नये, अशी अपेक्षा आता ओझरवासीयांकडून व्यक्त होऊ लागली आहे. 
ओझरला अनेक वर्षांनंतर सुसज्ज असे बसस्थानक तयार करण्यात आले होते. मात्र हे बसस्थानक आता सकाळी महाविद्यालयीन मुला-मुलींचे आणि प्रेमीयुगुलांचे हक्काचे ठिकाण, तर सायंकाळी मध्यपान करणाऱ्यांकरिता हक्काचे स्थान बनले आहे. यांसह परिसरात वाटेल तेथे शौचास जाणे, मार्बल ग्रेनाइटने बांधलेल्या वास्तूवर सर्रासपणे घाण टाकली असून, बसस्थानक खराब करण्यात आले आहे. स्थानकाच्या पाठीमागे मद्यपींकडून मद्याच्या बाटल्या तशाच टाकून दिल्या जात आहेत. त्यामुळे हे बसस्थानक आहे की मद्यपींचा अड्डा, अशीच स्थिती झाली आहे. 

बसस्थानकाचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचे आवाहन

या सुसज्ज आणि कोट्यवधी रुपये खर्ची करून बांधलेली इमारत पूर्वीप्रमाणेच चांगल्या स्थितीत ठेवावी, अशी माफक अपेक्षा आता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. महामंडळाने याकरिता योग्य ती पावले उचलावी, अशी मागणी आता होऊ लागली आहे. त्यामुळे या बसस्थानकाचे सौंदर्य टिकवून ठेवण्याचे आवाहन महामंडळापुढे आहे. 

Image may contain: house and outdoor

photo : ओझर येथे कोटी रुपये खर्चुन तयार करण्यात आलेल्या ओझर बसस्थानक व परिसरात झालेली अस्वच्छता.  
 

परवानग्यात रखडली मंजुरी 
ओझर बसस्थानकाचे काम पूर्ण होऊन ते कार्यान्वित झालेले नाही. एसटी महामंडळाने पाठवलेल्या प्रस्तावानुसार नाशिक जिल्ह्यातील बस वगळता इतर जिल्ह्यांत जाणाऱ्या बसला थांबा देण्याची परवानगी मिळाल्यानंतरच बसस्थानक प्रवाशांसाठी खुले होईल, याबाबत पाठपुरावा केला असता, अजून वरिष्ठ पातळीवरून बसस्थानक चालू करण्याकरिता परवानग्या मिळालेल्या नसल्याचे उत्तर विभाग नियंत्रकाकडून दिले जात आहे. 

हेही वाचा > PHOTO : दुभाजक ओलांडून एसटी घुसली थेट पंक्‍चर दुकानात..अन्...

 पोलिसगाडी एक; गुन्हे अनेक 
सुमारे लाखभर लोकसंख्या असलेल्या ओझरला सुरक्षिततेतिची हमी देणाऱ्या पोलिस प्रशासनाला देखील गस्त घालण्याची गरज निर्माण झाली आहे. आजपावेतो सर्व्हिस रोडने पोलिसगाडी गेली असती, तर पोलिसांचे लक्ष बसस्थानकाकडे गेले असते; तर उद्‌घाटनाच्या दिवशी दिसणारी वस्तू आजही तशीच दिसली असती. परंतु पोलिसांची गाडी एक आणि इतर गुन्हे अनेक त्यामुळे बसस्थानकातील टवाळखोर आणि मद्यपींकडे पोलिसांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ओझर पोलिस ठाणे आज गावापासून पर्यायी जागेअभावी दूर आहे. नवीन बसस्थानक हे पोलिस ठाणे अथवा महामार्ग वाहतूक नियंत्रक याकरिता वापरण्यासाठी दिले तरच ते चांगले व सुरक्षित राहील, असेही म्हटले जात आहे. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ozar bus station is now the point of mischievous Nashik Marathi News