व्हॅाट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामवरही थाटली राजवस्त्राची दुकाने...!

संतोष विंचू
सोमवार, 1 जुलै 2019

लेकी, सुना, नोकरदारांकडून जोडधंदा..
येथून बाहेरगावी व बाहेरून येथे विवाह करून आलेल्या अनेक मुलींनी देखील व्हॅाट्सअप ग्रुप व स्टेटस्च्या माध्यमातून पैठणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पैठणीची ऑर्डर आली की घरून किवा जवळील दुकानातून ती कुरियरद्वारे पोहोच करायची असा फंडा या महिला वापरतात. विशेष म्हणजे येथील अनेक युवक छोट्या-मोठ्या नोकरीनिमित्त बाहेरगावी असून त्याठिकाणी त्यांनीदेखील व्हाट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे विक्रीचा जोडधंदा सुरू केला आहेत.

येवला : हातात हिरवागार चुडा,भाळी चंद्रकोर टिकली,काणात देखणे कर्णफुले, आणि नाकात भरदरी नथ सोबत गळ्यात राणीहार अन टूशी आणि अंगावर ऐश्वर्यसंपन्न येवल्याचे महावस्त्र...ही आभूषण परिधान करणारी स्री शंभर जणीत उठून दिसतेच अन तिला आपल्या सौंदर्याचा नक्कीच हेवा वाटतो...स्त्रीचं सौंदर्य खुलवणाऱ्या या 
राजवस्त्राची क्रेज महिलांमध्ये जीन्स, टॅाप, सलवार, वनपीसच्या ग्लोबल जमान्यातही वाढत असल्याने येवल्याची पैठणीची बाजारपेठ खुलली आहे.

आता तर सप्तरंगी साड्यांनी खुललेल्या पैठणी शो-रूमला सोशल मीडियाचा मोठा आधार पैठणी विक्रीला होत आहे. येवल्याच्या गल्लोगल्ली पैठणीची दिमाखदार दुकाने दिसतात तशीच व्हॅाट्सअप, फेसबुक,इंस्टाग्रामवर देखील पैठणीची दुकाने थाटल्याने या व्यवसायाला नक्कीच हातभार लागला आहे. किमान ५०० जण याद्वारे विक्री करत असून यात महिला व युवकांची सख्या मोठी आहे. 

१९७२ च्या दुष्काळानतर काहीशी थंडावलेल्या बाजारपेठेने मागील पंधरा ते वीस वर्षात मात्र कात टाकली आहे. विशेषता गेल्या दशकात तर इतका पसारा वाढला की देश-परदेशातही नवी क्रेझ पैठणीची तयार झाली. यामुळे येथे ग्राहकांची संख्या प्रचंड वाढल्याने आज गल्लोगल्लीच नव्हे तर महामार्गांवर देखील पैठणीचे भव्यदिव्य शोरूम सुरू झाले आहेत. बाहेरून येणारा पैठणीचा ग्राहक एकतर स्थानिकांच्या सल्ल्याने किंवा दुकानांची पूर्ण माहिती घेऊन येतो त्यामुळे त्याचा कल येथे आल्यानंतर जुन्याजाणत्या व मोठ्या विक्रेत्यांकडे असतो. पण असाही एक वर्ग आहे कि पैठणी खरेदीची हौस आहे पण येथे येणे शक्य होत नसल्याने हौसेला मुरड घालावी लागते.हेच ओळखून शो-रूमसह छोटे विक्रेते,विणकरांनी मागील पाच ते सहा वर्षात सोशल मीडियाचा पैठणी विक्रीसाठी नव्या खुबीने कृतीत आणून त्याला यशस्वी केले आहे.

अशी होते विक्री..
येथील सुमारे ५०० वर विक्रेते,विणकर आणि सर्वसामान्य देखील आता ऑनलाईन सोशल मीडियावर पैठणी विक्रीचा व्यवसाय करत आहे. यासाठी दुकानदारांनी येऊन गेलेल्या ग्राहकांचे व्हाट्सअप ग्रुप बनवलेले असून त्यामध्ये रोज देखण्या पैठण्याचे फोटो टाकले जातात. अनेकदा नव्याने चौकशी करणाऱ्या ग्राहकांनाही व्हाट्सअप वर फोटो पाठवून त्यांच्या आवडीनिवडीनुसार पैठणी उपलब्ध करून दिली जाते. याशिवाय फेसबुकवर मोठ्या विक्रेत्यांनी स्वतःचे पेजेस तर इतरांनी पैठणीच्या नावाने खाते तयार केले असून त्यावर देखण्या फोटोंची मोहिनी ग्राहकांना घातली जाते. असाच पर्याय इंस्टाग्रामवर देखील असून दररोज नाविन्यपूर्ण फोटो टाकून ग्राहकांना आकृष्ट केले जात आहे. मोठ्या विक्रेत्यांनी तर दुकानांमध्ये स्वतंत्र मोबाईल आणि सेल्समन या कामासाठी ठेवलाय. अनेक विणकर व सर्वसामान्य महिला देखील या व्यवसायात उतरत असून स्वतःच्या व्हाट्सअपच्या स्टेटस मध्ये रोज विविधांगी फोटो ठेवून ग्राहकवर्ग मिळविण्याचा प्रयत्न होताना दिसतोय.विशेष म्हणजे दूरच्या ग्राहकांची पसंती या पर्यायांना मिळत आहे.

अशी घेतली जाते ऑर्डर
येथे खरेदीसाठी येऊन गेलेल्या अन नंतर येणे शक्य नसलेल्या तसेच दूरवरच्या महिलांना खरेदीस येणे शक्य नसल्याने हा उत्तम पर्याय ग्राहकांना देखील सापडला आहे. या माध्यमातून आवडलेल्या पैठणीचे दर विचारून किंमत ठरली की ग्राहक संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करतात आणि त्यानंतर सदरची पैठणी विक्रेते किंवा विणकर कुरीयरद्वारे संबंधित ग्राहकाच्या घरी पाठविते असा हा ऑनलाईन व्यवहार सुरू आहे.येथील ५०० वर ऑनलाईन विक्रेत्याद्वारे दिवसाला शंभराच्या आसपास किंबहुना त्यापेक्षा अधिक पैठण्यांची विक्री होत असल्याचेही सांगितले जाते.या पर्यायाने विक्रेत्यांना ग्राहक पर ग्राहकांना घरगुती खरेदीचा पर्याय मिळाला असून राज्य-देशातच नव्हे तर परदेशातूनही ऑर्डर मिळत असल्याने सद्यस्थितीत सोशल मीडियातून पैठणीचा व्यवसाय जोरात आहे.

लेकी, सुना, नोकरदारांकडून जोडधंदा..
येथून बाहेरगावी व बाहेरून येथे विवाह करून आलेल्या अनेक मुलींनी देखील व्हॅाट्सअप ग्रुप व स्टेटस्च्या माध्यमातून पैठणी विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. पैठणीची ऑर्डर आली की घरून किवा जवळील दुकानातून ती कुरियरद्वारे पोहोच करायची असा फंडा या महिला वापरतात. विशेष म्हणजे येथील अनेक युवक छोट्या-मोठ्या नोकरीनिमित्त बाहेरगावी असून त्याठिकाणी त्यांनीदेखील व्हाट्सऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामद्वारे विक्रीचा जोडधंदा सुरू केला आहेत.

“सोशल मीडियाने ऑनलाइन पैठणी विक्रीचा उत्तम पर्याय मिळाला असून उत्पादक ते ग्राहक असा थेट संवाद यामुळे होत आहे. दूरवरून येथे येणे शक्य् नसणाऱ्यांना देखील घरबसल्या पैठणी खरेदीचा पर्याय मिळाला आहे. यानिमित्ताने येवल्याची पैठणी दूर पर्यंत जात असल्याचा आनंद आहे.”
- मनोज दिवटे,पैठणी उत्पादक

“मी येवलेकर असून संगणक अभियंता म्हणून नोकरी करताना व्हाट्सअप ग्रुप व इंस्टाग्रामच्या माध्यमातून सुमारे वीस हजार लोकांपर्यंत पैठण्याचे डिझाइन्स पाठवतो. त्याद्वारे अनेक जण पैठणी खरेदीची ऑर्डर देतात व येवल्यातील उत्पादक मित्र अक्षय पेटकर त्या पैठण्या कुरिअरद्वारे पाठवतो. इंस्टाग्रामच्या माध्यमातून मराठी अभिनेत्री सायली संजीव,राधिका विद्यासागर,मयुरी देशमुख,अनिता केळकर आदि अभिनेत्रींना देखील येवला पैठणी दिल्या आहेत.”
-अतुल माळोकर,मुंबई

पैठणीच्या गावात...!
-हातमाग – सुमारे ३०००
-निर्मिती करणारी गावे - येवला, नागडे, बल्हेगाव, कोटमगाव, सुकी,जळगाव नेउर,आडगाव चोथवा,नांदेसर व इतर १५  
-गुंतलेली कुटुंबे – सुमारे ९०० 
-गुंतणारे हात - विणकामासाठी तीन हजार, तर इतर सर्व मिळून आठ-नऊ हजार व्यक्ती
-आवश्याक कच्चा माल - जर,रेशीम,रंग,हातमाग,
-आवश्याक साहित्य - हातमाग, वीज व भांडवल
-विक्रेते – भव्य शोरूम १२, इतर- ५० पर्यत 
-घरगुती उत्पादक विक्रेते – १०० हून अधिक
-ऑनलाईन विक्री करणारे - ५०० ते ८०० पर्यत 
-ऑनलाईन विक्री करणारे - सोनी, कापसे, भांडगे, तारांगण, साईकला, कस्तुरी, वडे, पहिलवान, लक्कडकोट, बाकळे, दिवटे, कर्हेकर, विधाते, हबीब, क्षत्रिय, नाकोड, पेटकर, कुक्कर, हांगे, कुमावत, डालकरी, नागपुरे, काथवटे, हारके, भोई, भागवत आदी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: paithani saree marketing on social media in Yeola