वर्षाला निरोप देताना वणव्याशी मुकाबला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

जळगाव - पालच्या जंगलातील रात्रीचा मिट्ट काळोख... दूरवर वणवा पेटलेला... आग विझविण्याचे कोणतेही साधन जवळ नाही... अशा विपरीत परिस्थितीत पाल वन परिक्षेत्रातील वनअधिकारी आणि वनमजुरांनी जिवाची पर्वा न करता, काळोखात अक्षरशः आठ-दहा किलोमीटरच्या क्षेत्रात पायपीट करून भीषण वणव्याशी मुकाबला केला आणि अखेर आग आटोक्‍यात आणली. शहरात सरत्या वर्षाला निरोप देण्याचा सर्वत्र जल्लोष सुरू असताना तिकडे जंगलात हे सगळे बहाद्दर आगीशी दोन होत करीत होते, हे विशेष..!

शनिवारी (ता. 31) पालहून खिरोद्याकडे जात असताना वनरक्षक अश्‍विनी ठाकरे आणि वन्यजीव संरक्षक विवेक देसाई यांना संध्याकाळी सहाच्या सुमारास धूर निघताना दिसला. त्यांनी जवळ असलेल्या कॅमेऱ्याच्या साहाय्याने झूम करून पाहिले असता, कक्ष क्रमांक (कम्पार्टमेंट) 40 मध्ये आग लागल्याचे लक्षात आले. क्षणाचाही विलंब न लावता ते माघारी फिरले. जातानाच वनरक्षक अश्‍विनी यांनी संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी पी. बी. सोनवणे, वनरक्षक व्ही. जी. विसपुते यांना ही माहिती कळवली. त्यांनी तत्काळ गाडीची व्यवस्था केली. या दरम्यान मिट्ट काळोखात आगीचे लोट दुरूनच दिसत होते. आग विझविणे आवश्‍यक होते. अशा परिस्थितीत गस्तीपथकाचे एस. व्ही. कुंभकर्ण, वनरक्षक व्ही. जी. विसपुते, अश्‍विनी ठाकरे, एन. ए. परदेशी, वनमजूर बबलू खान, संजय तडवी, न्याजुीन तडवी, विनोद तडवी, जितेंद्र पवार, अकबर तडवी, वन्यजीव अभ्यासक विवेक देसाई हे सर्व आगीच्या दिशेने निघाले.

अडथळ्यांचा डोंगर
तासाभराच्या प्रवासानंतर आग लागल्याच्या ठिकाणी वनरक्षक आणि वनमजूर पोचले. पण तेथे गेल्यावर आगीचे प्रत्यक्ष ठिकाण खूप लांब असल्याचे लक्षात आले. पुढे गाडी जाणे शक्‍य नव्हते. म्हणून पायी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. आग डोंगरमाथ्यावर लागली होती. साधारण तीन किलोमीटर चालल्यानंतर आगीच्या जवळ पोचता आले. तेथे चरे खोदून आग विझविली, तेव्हा दुसरीकडे वणवा पेटल्याचे लक्षात आले. त्या दिशेने निघाले असता साधारण दोन-तीन किलोमीटर चालल्यानंतर आगीच्या ठिकाणी पोचता आले. पाणी नसल्याने चरे खोदून, झाडाच्या फांद्यांच्या साहाय्याने आग विझविण्यात आली. अशा परिस्थितीत चार वेगवेगळ्या ठिकाणी आग लागल्याचे लक्षात आले. त्या चारही ठिकाणी पायीच जाऊन आग विझविण्यात आली.

जीपीएसने दाखविली वाट...
जंगलातील रात्र म्हणजे फुटावरचंही दिसणार नाही असा प्रकार... चार वेगवेगळ्या ठिकाणी लागलेली आग विझविल्यानंतर परतीचा प्रवास करायचा कसा हा प्रश्‍न वनअधिकारी आणि वनमजुरांसमोर होता, काळोखात दिशा कळत नव्हती. अशा परिस्थितीत जीपीएसने वाट दाखविली आणि या सर्वांना आपल्या गाडीपर्यंत पोचता आले. वनअधिकारी, वनमजूर आणि महिला वनरक्षक यांनी जिवाची पर्वा न करता अखेर जंगलातील वणव्यावर मात केली.

Web Title: pal forest fire