मेहुणबारे पं. स. गणात चुरस वाढली; दोन्ही उमेदवारांचा विजयाचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जून 2019

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांच्या उमेदवारांनी प्रचार नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली आहे. या गणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. चाळीसगाव पंचायत समितीतील बलाबल लक्षात घेता, सत्ताप्राप्तीसाठी विद्यमान खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. सद्यःस्थितीत दोन्ही उमेदवारांनी आपापल्या विजयाचा दावा केल्याने चुरस वाढली आहे. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : येथील पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांच्या उमेदवारांनी प्रचार नारळ वाढवून प्रचाराला सुरुवात केली आहे. या गणात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये सरळ लढत होत आहे. चाळीसगाव पंचायत समितीतील बलाबल लक्षात घेता, सत्ताप्राप्तीसाठी विद्यमान खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची ठरली आहे. सद्यःस्थितीत दोन्ही उमेदवारांनी आपापल्या विजयाचा दावा केल्याने चुरस वाढली आहे. 

मेहुणबारे पंचायत समिती गणाची यापूर्वी १७ डिसेंबर २०१७ ला निवडणूक झाली होती. त्यावेळी भाजपच्या रूपाली साळुंखे विजयी झाल्या होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे ही जागा दहा महिन्यांपासून रिक्त होती. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सुरुवातीला सात महिलांनी अर्ज दाखल केले होते. माघारीच्या दिवशी पाच उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे भाजपतर्फे सुनंदा साळुंखे व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जयश्री सांळुखे यांचेच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांच्यात सरळ लढत होत आहे. विशेष म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये बंडखोरी रोखण्यात दोन्ही पक्षांना यश आले आहे. 

दोन्हींचा विजयाचा दावा 
चाळीसगाव पंचायत समितीत भाजपचे ६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ७ सदस्य आहेत. सभापती निवडीच्यावेळी नाट्यमय घडामोडी घडून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समसमान बलाबल असताना भाजपच्या स्मितल बोरसे यांची सभापती म्हणून निवड झाली होती. आगामी अडीच वर्षासाठी सभापतिपदाचे आरक्षण लवकरच जाहीर होईल. त्यामुळे पुन्हा आपलाच सभापती व्हावा, यासाठी भाजप व राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी या निवडणुकीत सहभाग घेतला असून दोन्हींनी विजयाचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला या पोटनिवडणुकीत यश आल्यास त्यांची संख्या आठ होईल व भाजपला यश आल्यास पुन्हा समसमान पक्षीय बलाबल होईल. त्यामुळे या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे. भाजपमध्ये तिकीट वाटपावरूनच सुरुवातीला मोठी धुसफुस दिसत होती. त्यामुळे नाराज गटाची भूमिका देखील महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांचे भवितव्य येत्या २३ जूनला ठरणार आहे. 

भाजपसह राष्ट्रवादीही पोषक वातावरण 
मेहुणबारे पंचायत समितीच्या गणाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश साळुंखे यांच्या धर्मपत्नी जयश्री सांळुखे हे तर भाजपकडून पियूष साळुंखे यांची आई सुनंदा साळुंखे उभ्या आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील यशामुळे भाजपला पोषक वातावरण आहे. एकाच समाजाचे दोन्ही उमेदवार असल्याने एक गठ्ठा मतदानाची विभागणी होऊन त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल. त्यामुळे आमच्या पक्षाला पोषक वातावरण असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे. मतदार या गणाचे नेतृत्व करण्याची संधी कोणाला देतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Panchayat election in mehunbare