पुराच्या धोक्‍यामुळे व्यापारी धास्तावले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

पंचवटी - गंगापूर धरणाच्या साठ्यात लक्षणीय वाढ झाल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनातर्फे गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला आहे. त्यामुळे दुपारनंतर नाशिक-पंचवटीला जोडणारा रामसेतू पाण्याखाली गेला. पुराचे पाणी भांडी बाजारात शिरले असून, पुराच्या मागील कटू आठवणींमुळे येथील भांडी व्यापाऱ्यांसह कापड व्यापारी, सराफी व्यावसायिकही धास्तावले आहेत.

दुपारनंतर गोदेच्या पातळीत मोठी वाढ झाली. गंगाघाटावरील अनेक टपरीधारक, व्यावसायिकांनी आधीच टपऱ्या सुरक्षितस्थळी हलविण्यास सुरवात केली. यासाठी टपऱ्या हलविण्याचे काम करणाऱ्या हमालांना चांगला रोजगार मिळाला. गेल्या वर्षी सराफ बाजारातील व्यावसायिक व टपऱ्यांचे मालक यांच्यात टपऱ्या ठेवण्यावरून वादावादी झाली होती. कारण पूर ओसरला तरी मोठ्या प्रमाणावरील चिखलामुळे टपऱ्या बराच काळ सराफ बाजारातच पडून होत्या.

व्यापाऱ्यांनी हलविला माल
धास्तावलेल्या नदीकाठच्या व्यावसायिकांनी दैनंदिन व्यवसायापेक्षा माल सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठीच अधिक प्राध्यान्य दिले. रात्री उशिरापर्यंत अनेक व्यापाऱ्यांची माल हलविण्यासाठी लगबग सुरू होती.
 
महापुराच्या आठवणींमुळे काटा
गेल्या वर्षीही जोरदार पावसानंतर आलेल्या महापुराने शहरात हाहाकार उडाला होता. त्या पुराचे पाणी सराफ बाजार, भांडी बाजारात शिरून मोठे नुकसान झाले होते. अचानक वाढलेल्या पुरामुळे व्यापाऱ्यांना उसंतच मिळाली नव्हती. त्यामुळे सराफी व्यावसायिकांसह भांडी व कापड व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. आजच्या पुरामुळे अनेकांच्या अंगावर काटा आला होता.

Web Title: panchwati nashik news flood danger businessman confuse