पाणी विकत घेऊन फुलविलेली केळी उद्‌ध्वस्त 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 13 जून 2018

पाणी विकत घेऊन फुलविलेली केळी उद्‌ध्वस्त 

पाणी विकत घेऊन फुलविलेली केळी उद्‌ध्वस्त 

मुक्ताईनगर : वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आणि सुमारे पंधरा कोटींचे नुकसान झाले आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्या अंतुर्ली येथील शेतकऱ्यांच्या माथ्यावर कर्जाचा डोंगर उभा केला आहे. 
तापी नदीच्या पाण्यावर शेती अवलंबुन असलेल्या शेतकऱ्यांनी प्रसंगी पाणी विकत घेऊन केळी बाग फुलविली होती. पण नैसर्गिक आपत्तीमुळे होत्याचे नव्हते करुन टाकले. 
अशा परिस्थितीत राजकीय नेते शेतकऱ्याचा कैवारी असल्याचे सोंग आणत असल्याने संतापात भर पडली आहे. भेटी देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना पंचनामे त्वरित करा, जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिली. मात्र आठ दिवस उलटून देखील नुकसान भरपाई बद्दल कुठलीही घोषणा नाही. पालकमंत्री नुकसानग्रस्त भागाकडे फिरकले नसल्याने प्रचंड रोष आहे. 
दोन हजार केळी वादळ वाऱ्यामुळे पडली; लाखोंचे नुकसान झाल्याचे नितीन जैस्वाल म्हणाले तर, दहा हजार केळी उध्वस्त झाली आहे. अगोदरच पाण्याची कमतरता होती. इतर शेतकऱ्यांकडून पाणी घेऊन भर उन्हाळ्यात केळी वाचवली होती. आता ऐन तोंडाशी आलेला घास वादळी पावसाने हिरावून गेल्याचे प्रल्हाद गणपत दवगे यांनी डोळ्यात पाणी आणून सांगितले. 
तालुक्‍यातील 32 गावांमधील 2152 शेतकऱ्यांच्या 1556 हेक्‍टर क्षेत्रामधील केळी पिकाचे सुमारे 50 कोटी रुपयाचा नुकसान झाले त्यात मुक्ताईनगर महसुल मंडळातील 19 गावामधील 1274 शेतकऱ्यांचे 895 हेक्‍टर क्षेत्र, कुऱ्हा मंडळातील 13 गावांमधील 878 शेतकऱ्यांचे 661 हेक्‍टर क्षेत्रावरील केळीचे नुकसान आहे. 

बाधित झालेली गावे 
मुक्ताईनगर महसूल मंडळातील नरवेल, भोकरी, बेलसवाडी, बेलखेड, धामनदे, अंतुर्ली, पातोंडी, मेंढोळदे, कोठे, उचंदा, मेळसांगवे, घोडसगाव, तरोडा, हरताळे, कोथळी, मुक्ताईनगर, मानेगाव, पिंप्रीनांदू, नायगाव, तर कुऱ्हा मंडळातील कर्की धाबे, पिंप्रीपंचम, पिंप्रीभोजना, लोहारखेडा, पुरणाड, सुकळी, खामखेडा, दुई, नांदवेल, चिंचखेडा बुद्रुक, टाकळी व वायला. 

 
शेतकऱ्यांच्या व्यथा 

कर्जाचा डोंगर झाला 
शरद तराळ : लोकांची शेती मोठ्या प्रमाणावर केली होती आणि त्यांच्या शेतात 50 हजार ते 60 हजार केळी लावली होती. यांची पण पूर्ण केळी उध्वस्त झाली आहे. लाखो रुपयांचे कर्ज डोक्‍यावर घेऊन ही केळी उभी केली होती. नुकसानीने कर्जाचा डोंगर झाला आहे. 

कोलमडून गेलो 
अशोक महाजन : शेती भागात अगोदरच पाण्याची कमतरता आहे आणि पाण्याअभावी बऱ्याच दिवसांनी दहा हजार केळीची खोडे लावली होती. परंतु तोंडाजवळ आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने पूर्णपणे कोलमडून गेलो आहे. 

भामदारा परिसरात नुकसान 
नितीन दाणी : आमची 20 ते 25 हजार केळीची झाडे उद्‌ध्वस्त झालेली आहेत. अंतुर्ली परिसरात भामदारा परिसरातील भागातील जवळपास पूर्ण केळी उद्‌ध्वस्त झालेली आहे. 
 

Web Title: pani