पंकज भुजबळ मातोश्रीवर पोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चा

संजीव निकम
गुरुवार, 10 मे 2018

नांदगाव - आमदार पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने तालुक्यासह नांदगाव विधानसभा मतदार संघातल्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जामिनावर मुक्तता झाल्यावर स्वतः छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार नांदगावचे आमदार असलेले त्यांचे पुत्र पंकज यांनी ठाकरे यांना भेटलेत असे सांगण्यात येत आहे. 

नांदगाव - आमदार पंकज भुजबळ यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने तालुक्यासह नांदगाव विधानसभा मतदार संघातल्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची जामिनावर मुक्तता झाल्यावर स्वतः छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार नांदगावचे आमदार असलेले त्यांचे पुत्र पंकज यांनी ठाकरे यांना भेटलेत असे सांगण्यात येत आहे. 

दरम्यान, नांदगाव विधानसभा मतदार संघातील राजकीय वातावरण या भेटीने पुरते ढवळून निघाले आहे. अलीकडच्या काळात थोरले भुजबळ तुरुंगात गेल्याचा परिणाम आमदार पुत्र असलेल्या पंकज यांच्या कामकाजावर कळत न कळत झाला होता. त्यातच जनसंपर्कासाठी असलेल्या कार्यालयाकडे फारसे कुणी फिरकत नव्हते. काही शासकीय बैठका अथवा महत्वाचे कार्यक्रम वगळता आमदार पंकज भुजबळ यांचा बराचसा वेळ न्यायालयीन बाबी व अन्य कारणांमुळे जात असल्याने नावापुरता जनसंपर्क असे स्वरूप या कालावधीत आले होते. या सर्व कालावधीत निर्मण झालेल्या पोकळीचा फायदा सर्वाधिक शिवसेनेला झाला. 

विधानसभा निवडणुकीत पंकज भुजबळ यांच्यासोबत असणारे बहुतांशी नेते पदाधिकारी यांनी स्वतःचा सवतासुभा उभा केला. त्यामुळे मनमाड व नांदगाव येथील बाजार समिती, नगरपालिका जिल्हा बँक जिल्हा परिषद पंचायत समिती व बहुतांशी ग्रामपंचायती अशी सर्व सत्ताकेंद्रे शिवसेनेला जिल्हाप्रमुख म्हणून मिळाली. त्यामुळे तालुक्यातल्या सर्व सत्तास्थानी आज शिवसेना आहे. शिवाय भुजबळ यांच्या सत्तेसोबत असणारे बहुतांशी समर्थक नेते कार्यकर्ते शिवसेनेच्या वळचणीला गेल्याचे दिसून आले. या सर्व वातावरणात राजकीय दृष्ट्या केवळ शिवसेनेचाच बोलबाला उभा राहिला. 

या सर्व बदलात जिल्हाप्रमुख असलेल्या सुहास कांदे यांचे परिश्रम व सूक्ष्म नियोजन त्यामागे आहे. त्यामुळे सध्या शिवसेना व एकघर हवा असे वातावरण सुहास कांदे यांचे आहे. असे शिवसेनेचे एकतर्फी वातावरण निर्माण होऊ पाहत असतांना मधल्या काळात छगन भुजबळ याना ज्या पद्धतीने तुरुंगात डांबले त्याच्या निषेधार्थ हिरेबंधूनी भुजबळ यांची बाजू घेत आपले समर्थन त्यांना देऊ केले. त्यामुळे पंकज भुजबळ तिसऱ्यांदा हॅट्ट्रिक करतील असे म्हणत त्यांच्या समर्थकांनी आपले आडाखे मांडण्यास सुरुवात केली. मात्र विधानसभा निवडणुकीला वर्षे दिड वर्षाचा शिल्लक असलेला कालावधी बघता दिल्ली अभी दूर है असे म्हणत विरोधकांनी या घडामोडीकडे दुर्लक्ष केले होते. मालेगाव तालुक्यातील पंचावन्न गावे हिरे यांच्या प्रभाव क्षेत्रातील असल्याने पंकज भुजबळ याना त्याचा लाभ होईल. अशी मांडणी त्यांचे समर्थक करीत होते. मात्र आज स्वतः पंकज भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अर्थात त्याला सदिच्छ भेटीचे स्वरूप असले तरी राजकीय वर्तुळात मात्र वेगवेगळे अन्वयार्थ लावले जात आहेत एवढे नक्की. 

Web Title: Pankaj Bhujbal reached Matoshri