पानसरे- कलबुर्गी हत्याकांडाच्या तपासार्थ पथक जळगावात 

पानसरे- कलबुर्गी हत्याकांडाच्या तपासार्थ पथक जळगावात 

जळगाव - नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, कर्नाटकातील एम.एम. कलबुर्गी आणि त्यानंतर गौरी लंकेश यांच्या देशभरात हादरवून टाकणाऱ्या हत्या प्रकरणाच्या तपासार्थ कोल्हापूर व बंगळुरुचे संयुक्त तपास पथक काल जळगावात आल्याचे वृत्त असून या पथकाने शहरातील वाघनगरात घराची झडती घेतल्यावर एकाला ताब्यात घेतल्याचे सांगितले जात आहे. असून रात्री उशिरापर्यंत त्याची गोपनीय ठिकाणांवर चौकशी सुरु होती. 

दरम्यान, गुप्तता पाळण्यासाठी म्हणून यासंदर्भात स्थानिक अधिकाऱ्यांकडूनही अधिकृत माहिती मिळू शकली नाही. तर दोन दिवसांपूर्वीच नालासोपाऱ्यातून जिवंत बॉम्बसह ताब्यात घेतलेल्या साधक वैभव राऊतच्या अटकेनंतर राज्यभरात होत असलेल्या "ऑपरेशन'चाही हा भाग असल्याचे वृत्त आहे. 

पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या हत्येसंदर्भात विशेष तपास पथके गठीत करण्यात आलेली आहेत. कोल्हापूर एसआयटीअंतर्गत या गुन्ह्याचा तपास सुरु असून एसआयटी प्रमुखांसह अधिकाऱ्यांचे पथक तपासाकरीता जळगावी आले आहेत. 

दाखल गुन्ह्याची नोंद 
तपासासाठी आलेल्या पथकाने हद्द असलेल्या पोलिस ठाण्यात रीतसर तपासाची नोंद केली असून कोल्हापूर आणि बंगळुरु (कर्नाटक)चे तपास पथक (गु.र.क्र. 22/1/2017) या गुन्ह्यातील कलम-302 (हत्त्या), कलम-114, कलम-118 अंतर्गत दाखल गुन्ह्याचा तपास संयुक्त पथक करीत आहे. 

वाघनगरात बंद घर उघडले 
तपासाकरीता साध्या वेशात आलेल्या पथकाने शहरातील दुर्गम भाग असलेल्या कोल्हे हिल्स्‌जवळील बंद घर उघडले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने चावी बनवणाऱ्या कारागीरला आणण्यात येऊन कुलपे उघडण्यात येऊन झडती घेण्यात आली. रात्री परतल्यावर या पथकाने एका तरुणाला ताब्यात घेतल्यावर रात्री उशिरापर्यंत पथक त्याची कसुन चौकशी करीत होते. 

तपास गोपनीय 
बाहेरील जिल्ह्याचे तपासपथक जळगावात आले आहे, मात्र ते कोणत्या प्रकरणासंबंधी आले आणि त्यांच्या पथकात कोण अधिकारी आहेत हे सांगता येणार नाही. तपास गोपनीय असल्याने त्याबाबत मलाही फारसे माहिती नाही. 
- दत्ता शिंदे, जिल्हा पोलिस अधीक्षक जळगाव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com