पोलिस दलाने उपसले "हद्दपारी'चे हत्यार 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 18 जुलै 2018

पोलिस दलाने उपसले "हद्दपारी'चे हत्यार 

पोलिस दलाने उपसले "हद्दपारी'चे हत्यार 

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर असामाजिक तत्त्वांवर नियंत्रणासाठी पोलिस दलाने हद्दपारीचे हत्यार उपसले आहे. विधानसभेतही सोमवारी पोलिसांच्या कारवाईचा मुद्दा उपस्थित झाला होता. पोलिस ठाणेनिहाय आलेल्या प्रस्तावांवर कामकाज होऊन संबंधितांना नोटिसा बजावण्यात येऊन चौकशीअंती प्रांताधिकाऱ्यांचे शिक्‍कामोर्तब होणार होते. गेल्या दहा वर्षांतील दाखल गुन्हे आणि सहा महिन्यांच्या अथक परिश्रमाअती शहर उपविभागातून 36 प्रस्तावात जवळपास 50 उपद्रवींवर कारवाई निश्‍चित असून त्यात, महापालिका निवडणूक रिंगणात सक्रिय असलेल्यापैकी सात सेलिब्रेटींचा समावेश असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 
महापालिका निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्या मार्गदर्शनात गेल्या दहा वर्षांपासूनच्या दाखल गुन्ह्यांवरुन गुन्हेगारांची कुंडल्या तयार करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील जवळपास तेरा हजारावर समाजकंटकाचा डाटा पोलिसदलाने तयार केला आहे. माघारीनंतर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे चित्र व चरित्र पोलिसदलाच्या संगणकावर उपलब्ध आहे. समाजकंटक, उपद्रवी गुन्हेगार आणि रेकॉर्डवरील संशयितांवर प्रभावी उपाययोजना व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याशी अगोदरच योग्य पद्धतीने समन्वय राखून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसह हद्दपारी, स्थानबद्धतेच्या आदेशांवर कारवाईचे नियोजन करण्यात आलेले आहे. शहरातील किरकोळ गुन्हेगारांसह अट्टल गुन्हेगार, सामाजकंटक, धुडगूस घालणारे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह टोळी युद्धात सक्रिय असणाऱ्या अशा एकूण 1 हजार 300 संशयितांचा "डाटा' उपलब्ध असून, त्या अनुषंगाने पुढील उपाययोजना करण्यात येत आहेत. 

ते सेलिब्रेटी कोण? 
निवडणूक काळात जवळपास 37 प्रस्ताव तयार झाले असून 50 हद्दपारी होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. हद्दपारीच्या या प्रस्तावांमध्ये सात सेलीब्रेटींच्या नावांचा समावेश असून हे सेलिब्रेटी कोण? याची उत्सुकता लागून आहे. 

प्रस्तावित हद्दपारीचे प्रस्ताव : 50 
नोटीस बजावणी, चौकशी पूर्ण : 36 
स्थानबद्धता : 3 तयार, 2 प्रस्तावित (एमपीडीए) 
प्रतिबंधात्मक कारवाई : 2 हजारांवर 
----------- 

Web Title: paolis