Dhule NCP News : ‘राष्ट्रवादी’त कलह; गोटे आणि भोसले यांच्यात पत्रकयुद्ध! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhule NCP News : ‘राष्ट्रवादी’त कलह; गोटे आणि भोसले यांच्यात पत्रकयुद्ध!

Dhule NCP News : ‘राष्ट्रवादी’त कलह; गोटे आणि भोसले यांच्यात पत्रकयुद्ध!

धुळे : शहरातील कचरा संकलन आणि वाहतुकीच्या प्रश्‍नावरून महापालिकेत झालेल्या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) गटबाजी उफाळली आहे.

यात पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे आणि शहराध्यक्ष रणजित भोसले यांच्यात पत्रकयुद्ध सुरू झाले आहे. अशा स्थितीत कार्यकर्ते संभ्रमावस्थेत सापडले आहेत. (paper war between gote and Bhosle sparks dispute over cities waste issue agitation dhule news)

महापालिकेत कचऱ्याप्रश्‍नी आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या काही आंदोलकांनी ठेकेदार स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकाला मारहाण केली. तसेच शाई व अंडे फेकून मारले. यानंतर व्यवस्थापकाने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भोसले व सहकारी आंदोलकांवर खंडणी, मारहाणीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. संबंधित आंदोलकांवर कारवाई होत नाही तोपर्यंत शहरात स्वच्छतेचे काम करणार नाही, अशी भूमिका ठेकेदार कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

गोटे यांची भूमिका

या पार्श्वभूमीवर श्री. गोटे यांनी पत्रकात म्हटले आहे, की स्वयंभू कंपनीच्या व्यवस्थापकाला काळे फासण्याच्या आंदोलनाशी राष्ट्रवादीचा संबंध नाही. संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांनी अकारण राष्ट्रवादीला शिव्यांची लाखोली वाहू नये. कुणाच्या कल्पनेतून आंदोलन होते, हा कार्यक्रम कधी ठरला, निर्णय कुठे झाला, आंदोलनाचे स्वरूप काय होते याबद्दल पक्ष म्हणून मला व पक्ष नेत्यांना काहीही माहिती नव्हती.

अन्य कुठल्याही राजकीय पक्षापेक्षा किमान दहापट मोठे राष्ट्रवादीचे धुळे शहरात कार्यालय आहे. या कार्यालयात पदाधिकाऱ्यांनी नियमितपणे उपस्थिती राखावी, असा आदेश पक्षाचे सर्वोच्च नेते शरद पवार यांनी जाहीरपणे दिले होते. त्याचे पालन न करता परस्पर बैठका आणि निर्णय घ्यायचे ही बेशिस्तीची सवय म्हणजे पक्षाचे काम असा समज काही कथित नेत्यांनी करून घेतला आहे.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

ठेकेदार व्यवस्थित काम करत नाही, चुका करतो, महापालिकेला फसवतो याची सर्व जबाबदारी महापालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची आहे. ठेकेदाराकडून अटी-शर्तींची पूर्तता होते की नाही याबाबत महापालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. ठेकेदार ही तात्पुरती व्यवस्था आहे. मात्र, महापालिका प्रशासन ही दीर्घकाळ चालणारी यंत्रणा आहे.

त्यामुळे ठेकेदाराविरूद्धचे आंदोलन समर्थनीय ठरु शकत नाही. आंदोलनाच्या घटनेशी पक्षाचा व पक्षनेतृत्वाचा संबंध नाही. त्यामुळे आंदोलक कर्मचाऱ्यांनी आम्हाला दूषणे देऊन उगाच पक्षाची आणि नेत्यांची प्रतिमा मलिन करू नये, असे आवाहन श्री. गोटे यांनी पत्रकाद्वारे केले.

भोसले यांची भूमिका

श्री. भोसले यांनी पत्रकात म्हटले आहे, की महापालिकेत कचऱ्याप्रश्‍नी स्वयंभू कंपनीविरुद्ध झालेले आंदोलन राष्ट्रवादीचेच होते. त्याच्याशी श्री. गोटे व लोकसंग्राम पक्षाचा संबंध नाही. राष्ट्रवादी हा राष्ट्रीय पक्ष सर्वोच्च नेते शरद पवार यांच्या विचारांवर चालतो. या पक्षात संघटन, पद, पदाधिकारी, त्यांचे काम, अधिकार हे सर्व नियमासह पक्षीय घटनेप्रमाणे चालते.

यात कुठेही हुकूमशाही पद्धत नाही. पक्षात ग्रामीण जिल्हाध्यक्ष, शहर- जिल्हाध्यक्षांना आपापल्या कार्यकक्षेत निर्णय घेण्याचा अधिकार असतो. पक्ष संघटन कसे बळकट होईल यासाठी जिल्हाध्यक्ष प्रयत्नशील असतात. कोणते आंदोलन कुठे, कसे करायचे हे निर्णय जिल्हाध्यक्ष घेतात.मात्र, श्री. गोटे हे पक्षात नवे आहेत.

त्यांना अजूनही राष्ट्रवादी पक्ष कळाला नाही. पक्षाची ध्येयधोरणे, कामाची पद्धत त्यांना माहीत नाही. श्री. गोटे आतापर्यंत छोट्या खासगी पक्षात काम करीत होते. लोकसंग्राम पक्षात तेच अध्यक्ष, तेच प्रवक्ता, तेच कार्यकर्ता आणि तेच खजिनदार होते. नवीन आलेल्यांनी पक्षनिष्ठा, धोरण हे जुन्या जाणत्या, निष्ठावंतांना शिकवू नयेत.

शहरात राष्ट्रवादीचे १८७ कार्यक्रम, विविध आंदोलने झालीत. श्री. गोटे यांना आमदारकीत स्वारस्य आहे. त्यामुळे त्यांनी तिथे लक्ष घालावे. जिल्हा निरीक्षक अर्जुन टिळे यांच्या मार्गदर्शन, तसेच मुंबई प्रदेश कार्यालयाच्या सूचनेप्रमाणे शहरात पक्षीय काम सुरू आहे. राजकीय जीवनात वावरताना अनेक संकटाचा सामना करावा लागतो. जनतेसाठी ते करावे लागते. त्यास घाबरण्याचे कारण नाही, असे श्री. भोसले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :DhuleNCPWar