पालकाकडून शिक्षकाला मारहाण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 ऑगस्ट 2019

घटना ‘सीसीटीव्ही’त कैद
घडल्या प्रकरणात पालकाने अश्‍लील शिवीगाळ करून शिक्षक राजेंद्र काशिनाथ बढे यांना मारहाण केली. इतर शिक्षकांनाही शिवीगाळ करण्यात आल्याचे प्राचार्या सुनेत्रा बखाल यांनी पोलिसांना सांगितले.

जळगाव - मुलीला शिक्षकांकडून हेतुपुरस्सर त्रास दिला जात असल्याचा आरोप करीत संतप्त पालकाने शाळेत येऊन गोंधळ घालत शिक्षकाच्या कानशिलात लगावली. ही घटना आज ओरिअन इंग्लिश स्कूलमध्ये घडली. दरम्यान, संबंधित पालकाने अश्‍लील शिवीगाळ करून शिक्षकांना मारहाण केल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात परस्परांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी शिक्षक आणि पालक पोहोचले होते. 

मू. जे. महाविद्यालयाजवळील ओरिअन इंग्लिश मीडियम स्कूलचे शिक्षक राजेंद्र काशिनाथ बढे दुपारी एकला रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले होते. पाठोपाठ प्राचार्य सुनेत्रा बखाल आणि वीस ते पंचवीस शिक्षकांचे शिष्टमंडळ होते. शिक्षक राजेंद्र बढे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मुली-मुलींचा मधल्या सुटीत वाद झाला असताना पालक जोत्स्ना चौधरी यांनी शिक्षकांशी वाद घातला. याचवेळेस मुलीचे वडील विनायक चौधरी शाळेत आले. काहीएक न बोलता त्यांनी शिक्षक राजेंद्र बढे यांच्या कानशिलात लगावून उपस्थित शिक्षक-शिक्षिकांना शिवीगाळ करून गोंधळ घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. शिक्षकांची तक्रार नोंदविल्यावर मारहाण करणाऱ्या पालकाला पोलिसांनी दूरध्वनीवर संपर्क साधून पाचारण केल्यावर मुलगी डिंपलने घडला प्रकार महिला उपनिरीक्षक कांचन काळे, रोहिदास ठोंबरे यांना सांगितला. मुलीच्या पालकांनी शिक्षकांविरुद्ध तक्रार दिली.

नेमके काय घडले?    
विनायक चौधरी (रा. अयोध्यानगर) यांची मुलगी डिंपल ओरिअन इंग्लिश शाळेत पाचवीत शिक्षण घेत आहे. दोन दिवसांपूर्वी शिक्षक राजेंद्र बढे यांनी इतर मुलींसह तिलाही रागावून हातावर छडी (फुटपट्टीने) मारली होती. तेव्हा पालकांनी कुठलीच तक्रार न करता खासगी रुग्णालयातून औषधोपचार केले. मंगळवारी (ता. ३०) मधल्या सुटीच्या वेळी वर्गातील मैत्रिणी डबा खात असताना डिंपलचा डबा सांडला. त्यावरून मैत्रिणींचा वादही झाला होता. म्हणून तेव्हाही तिलाच रागावण्यात आल्याने आज तिचे पालक शाळेत पोचले आणि वाद घडून आला.

‘आधी मुलाचे नुकसान; आता मुलीला त्रास’
विनायक चौधरी यांचा मुलगा रोहन हा देखील याच शाळेचा विद्यार्थी असून, डिंपलचा मोठा भाऊ आहे. रोहन नॅशनल स्वीमिंग चॅम्पियन आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डाच्या मान्यतेनुसार राज्य किंवा देशपातळीवरील खेळाळूंना शैक्षणिक अभ्यासक्रमात अतिरिक्त १५ गुण दिले जातात. रोहन दहावीत असताना त्याने राज्यस्तरीय आणि देशपातळीवरील स्वीमिंगमध्ये चमकदार कामगिरी केली होती. तसे प्रमाणपत्र, मेडल-ट्रॉफिज्‌ त्याकडे आहेत. शाळेने शिक्षण मंडळाकडे पाठपुरावा करून त्याचे पंधरा गुण दहावीच्या गुणपत्रिकेत सहभागी करून घेणे आवश्‍यक असताना शाळेने निष्काळजीपणा केला.

नाशिक बोर्डाने सूचित करूनही शाळेकडून पाठपुरावा झाला नाही. म्हणून पालक विनायक चौधरी यांनी शिक्षकांची तक्रार केली होती. मात्र, तेव्हा त्यांना विनवण्या करून प्रकरण आपसांत मिटविण्यात आले. त्याच पंधरा गुणांअभावी रोहनचा शासकीय अभियांत्रिकीचा प्रवेश हुकला...आणि आता त्याच्या लहान बहिणीला मागील प्रकाराची तक्रार केली म्हणून त्रास दिला जात असल्याचे विनायक चौधरी यांनी पोलिस ठाण्यात माहिती देताना सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Parents Beating to Teacher Crime