एसटीचे स्मार्ट कार्ड डोकेदुखी; वाहकांकडून अडवणूक

एसटीचे स्मार्ट कार्ड डोकेदुखी; वाहकांकडून अडवणूक

जळगाव : शासनाने परिवहन मंडळांच्या प्रवास सवलतींचे सर्वच जुन्या पद्धती बदलविताना स्मार्ट कार्डचा वापर सुरू केला आहे. अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून तर पत्रकारांपर्यंत सर्वांना स्मार्ट कार्ड दिले जात आहे. मात्र, हे स्मार्ट कार्ड पत्रकारांना प्रवासासाठी डोकेदुखी ठरत असून, अनेक वाहक हे कार्ड मान्य करायलाच तयार नसल्याचे दिसून आले आहे. 
परिवहन मंडळाच्या प्रवास सवलतींसाठी ज्येष्ठांना आधी आधार कार्डचा पुरावा दाखवावा लागत होता, तर पत्रकारांना हस्तलिखित स्वरूपातील कार्ड तयार करून दिले जात होते. पण, यातील कमतरता दूर करण्यासाठी शासनाने सर्वांसाठी स्मार्ट कार्डचा वापर अनिवार्य केला आहे. पत्रकारांनाही जुन्या पासेस जमा करून नवीन स्मार्ट कार्ड देण्यात आले आहेत. मात्र, निम्म्यापेक्षा जास्त वाहक हे कार्ड मान्य करीत नसल्याचे दिसून आले आहे. 
प्रस्तुत कार्डधारक प्रतिनिधीने याची पडताळणी करण्यासाठी जळगाव ते धुळे, धुळे ते शिरपूर, शिरपूर ते चोपडा आणि चोपडा ते जळगाव असा बसचा प्रवास केला. यापैकी जळगाव डेपोच्या वाहकाने जळगाव ते धुळे प्रवासाची नोंद आपल्या यंत्रात केली. मात्र, धुळे ते शिरपूर प्रवासात शिरपूर डेपोच्या महिला वाहकाने चक्क हे कार्ड चालत नाही, असे सांगून पत्रकाराकडून भाड्याचे पैसेच मागितले. मात्र पत्रकाराने कार्डावरील मजकूर नीट वाचायला सांगितल्यानंतर या महिला वाहकाने यंत्रात कुठलीही नोंद न करता मोफत प्रवास करू दिला. शिरपूर ते चोपडा प्रवासात वाहकाने कार्ड पाहून आपल्या यंत्रात मोफत प्रवासाची नोंद करून घेतली; तर चोपडा ते जळगाव प्रवासात वाहकाने पुन्हा स्मार्ट कार्ड मान्य करण्यास नकार दिला. याचाच अर्थ अनेक वाहकांच्या तिकीट यंत्रात या स्मार्ट कार्डसाठी कमांडच दिली नसल्याचे दिसून आले आहे. परिणामी आपल्या यंत्रात कार्डाची नोंदच होत नसल्याने कार्डधारक पत्रकारांना मोफत प्रवासासाठी या वाहकांची प्रसंगी झगडावे लागत आहे. 

डेपो मॅनेजरची जबाबदारी 
या संदर्भात जळगाव परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले, की स्मार्ट कार्ड प्रदान केल्या दिवसापासून त्यावर मोफत प्रवासाची सवलत दिली आहे. त्यासाठी वाहकांच्या तिकीट यंत्रात नोंदीसाठी तशा कमांड देण्यात आल्या आहेत. ज्या वाहकांकडून असे प्रकार होत असतील, त्यांच्या यंत्रात स्मार्ट कार्डच्या नोंदी येत नसतील, तर संबंधित डेपो मॅनेजरने आपल्या सर्व वाहकांच्या यंत्रात तशा नोंदी करण्याची सोय आवश्‍यक आहे. तथापि, सर्व वाहकांनी आपले कर्तव्य म्हणून आपल्या डेपो मॅनेजरकडून यंत्रात कार्डाच्या नोंदीची सोय करून घेणे आवश्‍यक आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com