अवैध धंद्यांचे नूतन पोलिस निरीक्षकांपुढे आव्हान

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 जून 2017

पारोळ्यात तालुक्‍यात चोऱ्यांचेही वाढते प्रकार - प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नांची गरज

पारोळ्यात तालुक्‍यात चोऱ्यांचेही वाढते प्रकार - प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नांची गरज

पारोळा - शहरासह तालुक्‍यात तत्कालीन पोलिस निरीक्षक भाऊसाहेब पटारे यांच्या कार्यकाळात अवैध धंद्यांनी कधी नव्हे एवढा कळस गाठला आहे. सर्वत्र राजरोसपणे सुरू असलेल्या या अवैध व्यवसाय चालकांवर कारवाई करावी अशी जुनी मागणी आजही कायम आहे. मात्र, आतापर्यंत पोलिसांना यावर जरब निर्माण करता आली नाही. किंबहुना ते करीत नसल्याने अवैध धंद्याचा तालुक्‍यात बोलबाला आहे. परिणामी या अवैध धंदे चालकांवर कारवाई करून त्यांना नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान नूतन पोलिस निरीक्षक एकनाथ पाडळे यांच्यासमोर उभे ठाकले आहे.

राजकीयांची खाण म्हणून तालुक्‍याची जिल्ह्यात प्रचिती आहे. मातब्बर लोकप्रतिनिधी तालुक्‍यात असताना आलबेलचे चित्र शेजारील तालुक्‍यांनी गृहीत धरले आहे. मात्र, इतर बाबत आलबेल नसले तरी मात्र अवैध धंदे चालकांसाठी ते आलबेल असल्याची कटुसत्य नाकारता येणार नाही.

शहरात ठिकठिकाणी सट्टा जुगाराची किराणा दुकाना सारखी दुकाने बिनधास्त थाटली आहेत. पोलिस ठाण्याच्या हाकेपासून त्याची सुरवात होऊन सर्वत्र ते दृष्टीस पडत आहेत. पत्ता जुगाराची तर कमालच आहे. बंद पडलेल्या दोन भर रस्त्यावरील परमिट रुम बिअरबार हे जुगाराची अड्डे राजमान्यतेसारखी दिमाखात सर्व सुविधायुक्त प्रतिष्ठितांसाठी खुली आहेत.

या ठिकाणी रोजची लाखो रुपयांची उलाढाल सुरू असून त्याकडेही पोलिस यंत्रणा सोयीने डोळेझाक करून आपला आशीर्वाद कायम ठेवत असल्याचा आरोप सर्वसामान्याच्या तोंडात आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशा नंतर शहरासह तालुक्‍यातील सर्वच देशी विदेशी परमिट रुम बिअरबार हे बंद झाले आहेत. परंतु शहरात आजही त्या दुकानातून सर्रास देशी विदेशी दारू विक्री पंटराच्या माध्यमातुन सुुरू आहे. काही परमिट चालकांनी तर चक्क आपापली दुकाने सुरू करून ती पूर्ववत विक्री करीत असल्याचे चित्र सहज निर्दशनास पडत आहे. दारूबंदी विभागांनी कारवाई करणे अपेक्षित असताना त्यावर अवैध दारू विक्री होत असल्याने स्थानिक पोलिसांनाही कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार आहेत. मात्र त्याकडेही सोयीने दुर्लक्ष हे सुरवाती पासून करण्यात आले आहे. घरफोडी, चोरीबाबत ही शहरात चित्र चिंतनीय आहे. 

अनेक घरफोडी, चोरीचे अद्याप उलगडा नसून नित्याने हे सत्र अधुन मधुन सुरू आहे. बसस्थानकावरील हे प्रकार सुरूच असून शेकडो चोऱ्यांचे पोलिस ठाण्यात नोंदच होत नसल्याचा अनुभव येत आहे.एकंदरीत तालुक्‍यात अवैध धंदेसह घरफोडी, चोरी, जुगार चालकांचा बोलबाला आहे. त्यावर कारवाई करून ते सर्व नियंत्रणात आणण्याचे शिवधनुष्य नूतन पोलिस निरीक्षक पाडळे यांना पेलावे लागणार आहे. ते यावर कसे व कधी नियंत्रण आणतात आणि आपला कार्यकाळ कशा पद्धतीने पार पाडतात याकडे तालुक्‍याचे लक्ष लागून राहणार आहे. विशेष म्हणजे पोलिस उपअधीक्षक युसूफ शेख हे नव्याने दाखल झाले आहेत. त्यांना देखील या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज असून पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्नाची गरज निर्माण झाली आहे.

महामार्गावर खुलेआम डांबरचोरी
राष्ट्रीय महामार्गवर गेल्या दोन वर्षा पासून सर्रासपणे विविध ढाब्यावर दिवसाढवळ्या डांबर चोरीचे उद्योग हे सुरू आहेत. महामार्गवरील अनेक ढाब्यावर डांबरचोरीचे टॅंकर हे उभे राहत असून त्यातून ढाब्ये चालकाकडून डांबरचोरी ही संगनमताने केली जात आहे. या संगनमतातुन संबंधित डांबर कंपनी  व मालकांची फसवणुक केली जात आहे. पारोळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पाच ढाब्यावर ही डांबरचोरीचे उद्योग सुरू आहेत. त्यावर देखील कारवाई करण्याचे आव्हान श्री  पाडळे पुढे आहे. यात काही पोलिसाकडूनच त्यांची दिशाभूल करण्याची शक्‍यता नाकारता येत  नाही. म्हणून त्यांनाच याबाबत सजगता बाळगणे गरजेचे ठरणार आहे.

Web Title: parola news police officer challenge by illegal business