शिरसमणीच्या जवानाचा छत्तीसगडला संशयास्पद मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 जुलै 2017

आत्महत्येची अधिकाऱ्याची माहिती; तर हत्येचा नातेवाइकांचा आरोप

पारोळा - शिरसमणी (ता. पारोळा) येथील रहिवासी व छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलिस दलात असलेला जवान शशिकांत वसंत शिंपी (वय ४०) यांचा काल (ता. २२) मध्यरात्री सुगमा (छत्तीसगड) येथे मृत्यू झाला. त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती तेथील एका अधिकाऱ्याने दिली आहे. याउलट, छळ करून त्यांची हत्या झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना भेटून चौकशी करणार असल्याचेही नातेवाइकांनी सांगितले. 

आत्महत्येची अधिकाऱ्याची माहिती; तर हत्येचा नातेवाइकांचा आरोप

पारोळा - शिरसमणी (ता. पारोळा) येथील रहिवासी व छत्तीसगड येथे केंद्रीय राखीव पोलिस दलात असलेला जवान शशिकांत वसंत शिंपी (वय ४०) यांचा काल (ता. २२) मध्यरात्री सुगमा (छत्तीसगड) येथे मृत्यू झाला. त्यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती तेथील एका अधिकाऱ्याने दिली आहे. याउलट, छळ करून त्यांची हत्या झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना भेटून चौकशी करणार असल्याचेही नातेवाइकांनी सांगितले. 

जवान शशिकांत शिंपी हे शिरसमणी येथील एका शेतमजूर कुटुंबातील. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण गावातच झाले. १९९७- ९८ च्या सुमारास पुणे येथे केंद्रीय राखीव पोलिस दलात (सीआरपीएफ) चालक म्हणून ते भरती झाले. पुणे येथेच प्रशिक्षण घेऊन ते श्रीनगर, जम्मू, आसाम, दिल्ली, दोन वर्षांपूर्वी पुणे व त्या ठिकाणाहून सुगमा (जि. रायपूर, छत्तीसगड) येथे ते कर्तव्य बजावीत होते. काल (ता. २२) सकाळी आठला त्यांनी मित्र व त्यानंतर चुलतभाऊ श्‍याम शिंपी यांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधला होता.

भ्रमणध्वनीवर आई व मोठा भाऊ शरद यांच्याशीही त्याने संवाद साधून ‘मी आजारी असून, मला घ्यायला या’ असे सांगितले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास त्यांनी मेहुणे दिलीप जाधव (रा. वलटान, ता. पाचोरा) यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यावेळी त्यांनी सांगितले, की मी आजारी आहे. मला दवाखान्यात घेऊन जात नाहीत. मला जेवणही मिळत नाही. शर्मा नामक अधिकारी ड्यूटीवर पाठवीत आहे. तो मला त्रास देत आहे. मला आता ते पनिशमेंटही करतील. तरी कृपया करून तुम्ही मला ताबडतोब घ्यायला या. मात्र, त्यानंतर मध्यरात्री अडीचच्या सुमारास पुणे येथे असलेल्या शशिकांत यांच्या पत्नी कविता यांना सुगमा येथून एका तिवारी नामक अधिकाऱ्याने शशिकांत यांनी गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती भ्रमणध्वनीवरून दिली. हे ऐकून शशिकांत यांच्या पत्नीने एकच हंबरडा फोडला. त्यानंतर त्यांनी ही माहिती शिरसमणी येथील सासू आणि जेठ यांना दिली. घटनेची माहिती मिळताच शशिकांतच्या मातोश्रींसह बंधूंनी आक्रोश केला. ग्रामस्थांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. 

शशिकांत यांच्या पार्थिव पोहोचविण्याबाबत आज दुपारपर्यंत संदिग्ध माहिती मिळत होती. यावेळी त्यांच्याकडे आज दुपारी वार्तांकनासाठी गेलेले ‘सकाळ’चे बातमीदार विश्‍वास चौधरी यांनी जळगाव नियंत्रण कक्षावरून छत्तीसगड सीआरपीएफ कार्यालयाचा क्रमांक घेतला. त्यांच्याशी याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले, की शशिकांतचा मृतदेह हा सुगमा येथून हेलिकॉप्टरने रायपूर येथे व तेथून विमानातून सायंकाळी सात वाजून ५० मिनिटांनी मुंबई येथे रवाना करण्यात येणार आहे. रात्री साडेअकराच्या सुमारास पार्थिव मुबंई येथे उतरविण्यात येईल. तेथून चारचाकी वाहनाने १०२ मुंबईचे ‘आरएफ’ या कंपनीचे जवान तो मृतदेह घेऊन सकाळी शिरसमणी येथे पोहोचतील. तसेच सुरेश कर्नार हा अधिकारी सुगमा येथून पार्थिवासोबत आहे. शशिकांतची विच्छेदनाची कागदपत्रे सोबत असल्याची माहितीही अधिकाऱ्याने यावेळी दिली. 

निवृत्ती होती १७ महिन्यांनंतर
जवान शिंपी यांचा सैन्यदलासोबतचा करार संपत येत होता. सुमारे १७ महिन्यांनंतर ते निवृत्त होणार होते. पाचोरा येथे सासुरवाडीला त्यांनी स्वतःचे घरही बांधले होते. शिरसमणी गावात ते एक होतकरू, धाडसी, मनमिळावू तरुण म्हणून परिचित होते. सुख- दुःखाला ते तातडीने धावून जात असल्याची माहिती वर्गमित्र महाजन यांनी दिली. त्यांच्यामागे पत्नी, आई, भाऊ, मुलगा उत्कर्ष (वय ७), एक अकरा महिन्याची मुलगी असा परिवार आहे. जवान शिंपी यांची पत्नी व मुले तळेगाव दाभाडे कॅम्प (पुणे) येथे स्थायिक आहेत.

Web Title: parola news shirasmani jawan shashikant shimpi suspected death