पासधारक विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 डिसेंबर 2016

लामकानी - राज्य परिवहन महामंडळाच्या नाकर्तेपणामुळे बससेवा उपलब्ध होत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांना मासिक पास काढूनही रिक्षांसह अन्य अवैध प्रवासी वाहतुकीच्या वाहनांचा आधार घेत शाळा ते घर आणि घर ते शाळा असा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. कधी अशा वाहनांच्या टपावर, तर कधी वाहनांना मागे लोंबकळत प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे.

सैताळे (ता. धुळे) येथील सर्व विद्यार्थी पाचवीपासूनच्या पुढील शिक्षणासाठी पाच किलोमीटरवरील लामकानी येथील इंग्लिश स्कूलमध्ये रोज ये-जा करतात. विद्यार्थ्यांनी त्यासाठी एसटी महामंडळाच्या मासिक पास योजनेचा लाभ घेतला आहे. तसेच मानव विकास अभियानाअंतर्गत विधार्थिनींना बारावीपर्यंत बससेवा मोफत असल्याने पालक व इंग्लिश स्कूलच्या शिक्षकांनी विनंती करून महामंडळाची बससेवा सुरू केली; परंतु सायंकाळी साडेपाचला येथे येणारी बस आजपर्यंत एकदाही वेळेवर आलेली नाही. त्यामुळे नाइलाजाने विद्यार्थी, विद्यार्थिनींना रोज रिक्षा अथवा अन्य खासगी प्रवासी वाहनांनी घरी जावे लागत आहे. यात त्यांना नाहक आर्थिक भुर्दंड तर बसतोच. शिवाय कधी या वाहनांच्या टपावर, तर कधी मागे लोंबकळत जीव धोक्‍यात घालून प्रवास करावा लागतो. अनेकदा तर वाहने उपलब्ध होत नसल्याने शिक्षकांसह स्वतः विद्यार्थ्यांनाच घरी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था करून घ्यावी लागते. अनेकदा शिक्षकांना रोजचा त्रास नको म्हणून सर्वच विद्यार्थी-विद्यार्थिनी सायंकाळी शाळा सुटल्यानंतर पायीच घरी परततात.

शिक्षक-पालकांना चिंता
या विद्यार्थ्यांमध्ये नववी-दहावीच्या विद्यार्थिनीही मोठ्या संख्येने असल्याने आपले पाल्य कधी घरी पोहोचतात, अशी चिंता पालकांना लागलेली असते. शिक्षकही पाल्य सुखरूप घरी पोहोचावेत म्हणून रोजच चिंता करत असतात. याबाबत अनेकदा महामंडळाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केल्यानंतरही बससेवा सुरळीत होत नसल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शाळा सुटल्यावर शिक्षक रोज धुळे आगारात फोन करून बस सुटली का अशी विचारणा करतात. मात्र, तिकडून ‘नाही’,  उद्यापासून बस येईल, असेच उत्तर दिले जात असल्याची तक्रारही शिक्षकांनी केली आहे.

Web Title: Pass holders students dangerous traveling