प्रवासी वाढविण्यासाठी आगाराने कंबर कसली

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जानेवारी 2017

चाळीसगाव - बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे आगाराच्या उत्पन्नात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. उत्पन्न वाढावे यासाठी आगाराने ‘प्रवासी वाढवा’ अभियान राबविण्यासाठी कंबर कसली आहे. या अभियानात वाहक व चालकांना विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. 

चाळीसगाव - बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. यामुळे आगाराच्या उत्पन्नात सातत्याने घट होत असल्याचे दिसून येत आहे. उत्पन्न वाढावे यासाठी आगाराने ‘प्रवासी वाढवा’ अभियान राबविण्यासाठी कंबर कसली आहे. या अभियानात वाहक व चालकांना विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. 

बसस्थानकातील विविध कारणांमुळे प्रवाशांची संख्या कमी होत आहे. यामागे अनेक कारणे असली, तरी बसमधून प्रवास करताना प्रवाशांना पाहिजे तशा सोयी-सुविधा मिळत नाहीत. त्या तुलनेत सातत्याने भाडेवाढ मात्र केली जाते. भाडेवाढ होऊनही आगाराच्या उत्पन्नात भर पडताना दिसत नाही. यामुळे महामंडळाने १ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत प्रवासी संख्या वाढविण्यासाठी वेगवेगळ्या बक्षिसांची घोषणा केली आहे. 

पाच लाख प्रवासी 
येथील आगाराच्या सुमारे ९० बसच धावतात, तर दोनशेपेक्षा अधिक बसेस बाहेरगावाहून बसस्थानकात येतात. या माध्यमातून महिन्यातून सुमारे पाच लाख प्रवाशांची ये- जा होते. मात्र, ही आकडेवारी गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने कमी अधिक होत आहे. ही प्रवासी संख्या ‘जैसे थे’ न राहता, यात भर पडावी यासाठी आगाराने पावले उचलली आहेत.

आगारातून लांब पल्ल्याच्या गाड्यांपेक्षा ग्रामीण भागातून अधिक प्रवासी नियमित प्रवास करतात. ठरलेल्या वेळापत्रकानुसार बसेस धावत असल्या तरी ग्रामीण भागातील टप्पा वाहतुकीवर आगाराने लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टप्पा वाहतुकीवरील प्रवासी घेण्यासंदर्भात वेगळी भूमिका आगाराने घेतली असून, त्यामुळे ‘एसटी’च्या उत्पादनात मोठी वाढ होईल, अशी आगारप्रमुखांना अपेक्षा आहे. 

विविध बक्षीस योजना 
प्रवासी वाढवण्यासाठी आगाराने नुकतीच बक्षीस योजना जाहीर केली आहे. आगारांना एक लाखांचे पहिले बक्षीस तर वाहकांना पाच हजार, चालकास तीन हजार यासह इतरही वैयक्तिक बक्षिसे दिली जाणार आहेत. विभागातून दरमहा एका आगाराला पन्नास हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल. 

हात दाखवा बस थांबवा?
अनेकदा ग्रामीण भागातून बस धावताना बऱ्याच वाहकांकडून त्या थांबविल्या जात नाहीत. ‘मागून बस रिकामी येत आहे’ असे कारण दाखवून प्रवाशांना घेण्याचे टाळले जाते. यामुळे ‘हात दाखवा बस थांबवा’ च्या घोषवाक्‍याला ‘खो’ दिला जातो. आता ही बक्षीस योजना राबविली जात असल्याने किमान वाहक व चालक बसेस थांबवून प्रवासी वाढीसाठी प्रयत्न करतील. दरम्यान, अनधिकृत प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळेही आगाराच्या उत्पन्नावर विपरित परिणाम होतो. त्यामुळे या संदर्भातही ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी होत आहे. 

बसस्थानकातून प्रवाशांची संख्या वाढविण्यासाठी बक्षीस योजनेच्या माध्यमातून सांघिक प्रयत्न केले जातील. अनधिकृत प्रवासी वाहतूक होऊ नये, यासाठी आगारातर्फे पोलिसांना दर आठवड्याला पत्र दिले जाते. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नाही.
- सागर झोडगे, आगार व्यवस्थापक, चाळीसगाव

Web Title: passenger increase planning by bus depo