रिक्षाचालकांच्या ‘बंद’मुळे प्रवाशांचे हाल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

वृद्ध, महिलांसह विद्यार्थ्यांची पायपीट; थांब्यावरील रिक्षांची काढली हवा
जळगाव - वाहनकरात केलेल्या शुल्कवाढीविरोधात प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेच्या कृती समितीने आज सर्व रिक्षा, टॅक्‍सी व मालवाहतुकीची वाहने बंद ठेवली. रिक्षांअभावी नागरिकांना बॅगा, सामान डोक्‍यावर घेऊनच पायपीट करावी लागली. यामुळे बाहेरगावाहून आलेले आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

वृद्ध, महिलांसह विद्यार्थ्यांची पायपीट; थांब्यावरील रिक्षांची काढली हवा
जळगाव - वाहनकरात केलेल्या शुल्कवाढीविरोधात प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेच्या कृती समितीने आज सर्व रिक्षा, टॅक्‍सी व मालवाहतुकीची वाहने बंद ठेवली. रिक्षांअभावी नागरिकांना बॅगा, सामान डोक्‍यावर घेऊनच पायपीट करावी लागली. यामुळे बाहेरगावाहून आलेले आणि बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

केंद्र सरकारच्या परिवहन विभागाकडून डिसेंबरमध्ये सर्व वाहनांच्या विविध प्रकारांतील करात केलेली शुल्कवाढ तीन ते चारपट आहे. केंद्र सरकारच्या परिवहन विभागाकडून नवीन वाहन नोंदणी, योग्यता प्रमाणपत्र, नूतनीकरण, वाहन हस्तांतर, दुय्यम नोंदणी पुस्तिका, परवाना नूतनीकरण, परवाना उतरविणे यासारख्या विविध प्रकारच्या करातील शुल्कवाढीचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी आज प्रवासी व मालवाहतूकदार संघटनेच्या कृती समितीने ‘बंद’ पाळण्यासह धरणे आंदोलन केले. करातील शुल्कवाढ ही सर्वांसाठी अन्यायकारक असून, ती रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन पुकारण्यात आले.

प्रवासी ताटकळत
रिक्षा, कालीपिली तसेच ट्रॅव्हल्सचा चोवीस तासांचा बंद पाळण्यात आला. यामुळे सकाळपासूनच रस्त्यावरून रिक्षा किंवा ट्रॅव्हल्स प्रवासी वाहतूक करताना दिसून आले नाहीत. रिक्षा बंदची माहिती अनेक नागरिकांना नसल्याने बहुतेक जण बाहेरगावी जाण्यासाठी घरून निघाले होते. तसेच बाहेरगावी गेलेले घरी परतल्याने त्यांना जाण्यासाठी रिक्षाच उपलब्ध होत नव्हती. यामुळे बराच वेळेपर्यंत ताटकळत उभे राहावे लागत होते. रिक्षा बंदची माहिती मिळाल्यानंतर संपर्क साधून घरून दुचाकी मागविण्याचे काम केले जात होते.

रेल्वे, बसस्थानकावर गर्दी
शहरात कामानिमित्त येणाऱ्या आणि जाणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. यामुळे जुन्या बसस्थानकाबाहेर प्रवाशांची गर्दी होती. तसचे रेल्वे आणि बसस्थानकावरही प्रवाशांची गर्दी होती. प्रामुख्याने बाहेरगावाहून आलेल्यांचे प्रमाण अधिक असल्याने कोणते वाहन मिळेल का? या प्रतीक्षेत प्रवासी बसस्थानक आणि रेल्वेस्थानकाबाहेर उभे असल्याचे पाहावयास मिळाले. महिला व वृद्धांना याचा अधिक त्रास सहन करावा लागला, तर रिक्षाच मिळत नसल्याने दुचाकीवरून तीन-चार जण जातानाचे चित्र आज दिवसभर पाहावयास मिळाले.

रिक्षाच्या चाकांमधील काढली हवा
शहरातील सर्वच रिक्षाचालक- मालकांनी आज रिक्षा बंद ठेवल्या. परंतु, काही जणांकडून रिक्षातून प्रवासी वाहतूक सुरू होती, तर काही रिक्षाचालक कुटुंबातील सदस्यांना घेऊन जाताना बंद पाळलेल्या रिक्षाचालकांकडून या रिक्षांची अडवणूक करून परतविले जात होते. इतकेच नव्हे, तर काही थांब्यांवर उभ्या रिक्षांच्या चाकांमधील हवा काढण्यात येत होती.

प्रवाशांचे बोल...

हिंमत माळी - रेल्वेद्वारे बाहेरगावी जाण्यासाठी आलो असून, सकाळी एरंडोल येथून बसने जळगावला आलो. मात्र, रिक्षा बंदबाबत कोणतीही माहिती नव्हती. येथे आल्यानंतर ती माहिती झाली. बसस्थानकावरून रेल्वेस्थानकावर जायचे असून, अवजड सामान घेऊन चालतच जावे लागत आहे.

विमलबाई खैरनार - नेरी येथे लग्नाला गेले होते. आज घरी जाण्यासाठी परतले. रिक्षा बंदची माहिती नसल्याने सकाळी घरून निघाले. आता हरिविठ्ठलनगरात जायचे आहे. रिक्षाची वाट पाहून थकले. फोन नंबर माहिती नसल्याने कोणाला फोन करून सांगताही येत नाही. पायपीट करून थकवा आला, तरीही गाडी नाही मिळाली तर पायीच जावे लागणार.

कपिल चौधरी - आव्हाणे (ता. जळगाव) येथून रोज कॉलेजसाठी जळगावात येतो. ‘केसीई’च्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. नेहमीप्रमाणे सकाळी कॉलेजला जाण्यासाठी आलो खरा, पण रिक्षा बंदची येथे आल्यावर माहिती मिळाल्याने कॉलेजला पायीच गेलो आणि आलो. करातील शुल्कवाढीसाठी केलेला बंद योग्य असून, सरकारने याचा विचार करावा.

प्रमोद नवगाने - मी मूळचा प्रितमपूर (मध्य प्रदेश) राहणारा आहे. जळगावात कामानिमित्त दोन दिवसांपूर्वी आलो होतो. आज घरी जाण्यासाठी निघालो तर रिक्षा बंद आहेत. मित्राने रेल्वेस्थानकापर्यंत दुचाकीने सोडले. आता बसस्थानकावर जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध नसल्याने पायीच निघालो.

गजू तांबट - नाशिकला वणीच्या गडावर दर्शनासाठी परिवारासमवेत गेलो होता. आज परतलो असून, रिक्षा नसल्याने एक तासापासून रेल्वेस्थानकावर उभा आहे. घरी फोन लावून गाडी बोलावली आहे. मुख्य म्हणजे शासनाने केलेली ही करवाढ नको होती. कारण प्रवाशांना याचा त्रास होतो, याचा विचार व्हावा.

Web Title: passengers problem by rickshaw ban